आमच्या हृदयात असणारी काँग्रेस तुम्ही कशी काढणार- राजाभाऊ ठाकूर

 आमच्या हृदयात असणारी काँग्रेस तुम्ही कशी काढणार- राजाभाऊ ठाकूर


माणगावात काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार ठाकूर यांच्या सभेला प्रतिसाद

 पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि. १८- आमच्या हृदयात असणारी काँग्रेस तुम्ही कशी काढणार आमच्यावर कारवाई करण्याचा अधिकार कोणाला नसून तो अधिकार फक्त नी फक्त आमचे नेते राहुल गांधींना असल्याचे प्रतिपादन श्रीवर्धन मतदार संघातील काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी माणगाव येथील सभेत बोलताना व्यक्त केले.    माणगावात काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांच्या सभेला उस्फुर्त असा  प्रतिसाद लाभल्याने याचा धसका विरोधकांनी घेतला आहे.

 १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची निवडणूक येत्या २० नोव्हेंबरला होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रचारार्थ खरे मंगल कार्यालय माणगाव याठिकाणी शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थितांना उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. या सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे महासचिव तथा ठाणे जिल्हा प्रभारी असलेले चंद्रकांत पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस सचिव डॉ.नरेंद्र सिंग,शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सदानंद येलवे,रोहा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनील देशमुख, तळा तालुका अध्यक्ष शरद भोसले, माणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास सुर्वे, राज्य बेलदार समाज संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल मोहिते, रोहा तालुका वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष देविदास जाधव, शेकापचे नेते मुस्ताक दांडेकर,निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते फारुख परकार,मोहम्मद सय्यद डावरे, तळा महिला काँ.शहर अध्यक्ष अकबरी गोटेकर,प्राजक्ता लोखंडे,काँग्रेस पर्यावरण सेलचे अध्यक्ष मंदिप सकपाळ आणि तळा शेत गट काँग्रेस अध्यक्ष मांदेश मोरे यांच्यासह राजाभाऊ ठाकूर समर्थक,मित्रपरिवार व कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

 यावेळी बोलताना राजाभाऊ ठाकूर पुढे म्हणाले कि, घराणेशाही,भ्रष्टचार याबाबत मी काही बोलणार नाही. राजाभाऊ हा जनतेच्या मनातील उमेदवार आहे. आपल्या सर्वाना  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे. श्रीवर्धन मतदार संघात आपल्याला नव्या जोमाने काम करायचे आहे. यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात संपूर्ण मतदार संघाचा अभ्यास करून उतरलो आहे. माझे वडील स्व.मधुकर ठाकूर हे सन २००४ मध्ये अलिबाग विधानसभेतून निवडून आले होते. एक सच्चे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख रायगड जिल्ह्यात सर्वत्र होती. त्यांचा सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील आदर्श नजरेसमोर ठेऊन आम्ही ठाकूर कुटुंबीय बहुजन समाजातील गोरगरीब जनतेसाठी काम करीत आहोत. आज आपल्या आदिवासी समाजातील एखादा मुलगा इंजिनिअर होत असेल तर ती अभिमानास्पद बाब आहे. हे ओळखून या समाजातील माझ्याकडे आशेने आलेल्या विध्यार्थ्याला आपण मदत केली. असे अनेक सामाजिक कार्य वडिलांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन आम्ही रायगड जिल्ह्यात करीत आहोत. श्रीवर्धन मतदार संघात बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे. अनेकांना रोजगारासाठी मुंबई - पुणे येथे जावे लागते. हे प्रश्न गेली अनेक वर्ष प्रस्तापितांकडून सोडविण्यात आलेले नाहीत. या मतदार संघाचा ईश्वरी कृपेने व पप्पांच्या तसेच मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने आमदार झाल्यावर यांसारखे विविध प्रश्न आपण सोडवून मतदार संघाचा चौफेर विकास साधू. मला आपण सर्वानी माझ्या शुभ कार्यात वापरण्यात येणाऱ्या लिफाफा निशाणी शेजारील बटन दाबून मला विधानसभेवर भरघोस मतांनी निवडणून पाठवा अशी विंनती ठाकूर यांनी केली. यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे महासचिव तथा ठाणे जिल्हा प्रभारी असलेले चंद्रकांत पाटील यांनी सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करणारे राजाभाऊ ठाकूर यांच्या पाठीशी आपण सर्वानी ताकद उभी करा असे आव्हान केले. शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सदानंद येलवे यांनी आपल्या मार्गदर्शनात खरी काँग्रेस हि राजाभाऊंच्या पाठीशी असून ये अंदर कि बात है असे सांगत अनेक अदृश्य शक्ती त्यांच्या सोबत असल्याने राजाभाऊंचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.  माणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास सुर्वे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना रायगडात आपल्याला काँग्रेस पक्ष वाढवायचा असेल तर विजयी करणे आवश्यक आहे. बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते तयार झाले. या जिल्ह्याचा व श्रीवर्धन मतदार संघाचा विकास खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तर तो बॅरिस्टर अंतुले साहेबानी केला आहे. त्यांच्या कार्याचा आलेख पाहता आपल्याला सच्चा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून राजाभाऊ ठाकूर यांना बहुमताने निवडून देऊन आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेवर पाठवायचे असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या