कृष्णदास निघालेत सर्वधर्मीय एकोप्यासाठी पायी भारतभ्रमंतीला

 कृष्णदास निघालेत सर्वधर्मीय एकोप्यासाठी पायी भारतभ्रमंतीला


पो. नि. राजेंद्र पाटील यांनी भेटून केली विचारपूस

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १६- भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या भारत देशात हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई अशा अनेक जाती धर्माचे लोक राहतात. संपूर्ण भारत देशातील सर्वधर्मीय लोक एकोप्याने रहावेत यासाठी पश्चिम बंगाल येथील कृष्णदास पायी अनवाणी भारत भ्रमंतीला निघाले आहेत. 


दि. १५ एप्रिलच्या सायंकाळी माणगांव पो. नि. राजेंद्र पाटील हे मुंबई गोवा महामार्गावरून पेट्रोलिंग करीत असताना खरवली फाटा येथील हॉटेल ओपन अँब्रेला जवळ तिरंगा हातात घेऊन अनवाणी एक इसम चालताना दिसले. त्यावेळी गाडी थांबवून पाटील यांनी विचारपूस केली असता कृष्णदास हे भारत देशातील सर्वधर्मीय लोकांनी एकोप्याने राहावे यासाठी अनवाणी पायी चालत भारत भ्रमंतीला निघाले असल्याचे समजले.  


कृष्णदास हे मूळ पश्चिम बंगाल येथील असून ते डिसेंबर २०२२ पासून पायी अनवाणी भारत भ्रमंतीला निघाले आहेत. आतापर्यत त्यांनी एकूण ७ राज्य पायी चालून आता ते महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात पोहचले आहेत. त्यांनी एकूण ४०००-४५०० किमी अंतर पायी कापले आहे. पश्चिम बंगाल, उडीसा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, हे सात राज्य पायी चालत पूर्ण केले आहेत. दिवसाला सुमारे ५०-६० किमी अंतर ते रोज पायी चालतात. त्यांच्या हातात भारतीय झेंडा घेत ते हा प्रवास करीत आहेत. पो. नि. राजेंद्र पाटील हे नेहमीची सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. कृष्णदास यांना भेटल्यानंतर पो. नि. राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, अशा लोकांमुळे समाजात एक चांगला संदेश जात असून सर्वधर्मीयांनी एकोप्याने गुण्यागोविंदाने या देशात राहिले पाहिजे. वयस्कर असून सुद्धा एवढ्या रखरखत्या उन्हात ते अनवाणी चालत असून त्यांच्याकडून जिद्द, चिकाटी सारखे गुण व काम जोमाने करण्याची प्रेरणा मिळते.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या