माणगांवचे माजी नगराध्यक्ष आणि भसीन बिल्डरमध्ये राडा
परस्पर विरोधात गुन्हे दाखल
नक्की प्रकरण काय? माणगांवकरांमध्ये चर्चा
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि १०- माणगांवचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव आणि माणगाव मधील भसीन बिल्डर यांच्यामध्ये दि. ९ मार्च रोजी राडा असल्याची घटना घडली आहे. याबाबत माणगांव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. ९ मार्च रोजी दु. १.३० वा. च्या सुमारास फिर्यादी भाग्यश्री आनंद यादव, रा. मोहर बंगलो, साईनगर, माणगांव या घरी स्वयंपाक बनवत असताना त्यांना रूममधील खिडकीतून ३-४ माणसे घराकडे येताना दिसली. फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला असता आरोपी जयराम भसीन दिसले. व आरोपी बळजबरीने घरात घुसून आनंद भैयाला संपवतोच. तुम्हाला जास्त माज आलाय, तुम्ही स्वतःला कोण समजताय असे बोलले. तसेच फिर्यादी यांच्या सासुबाईकडे बोट दाखवत तुमचा आनंद भैया कधी गायब करील हे तुम्हाला कळणार पण नाही. तो माझ्या तावडीत येऊ दे त्याला संपवतोच असे बोलून निघून गेला. त्यानंतर दु. २.१५ वा. च्या सुमारास आरोपी जयराम भसीन व त्यांची पत्नी आरोपी दिव्या जयराम भसीन फिर्यादी यांच्या मोबाईलवर फोन करून शिवीगाळ केली व तुमच्या कुटुंबाला आम्ही संपवून टाकू अशी धमकी दिली.
या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. ६४/२०२३ भा. दं. वि. सं. क. ४५२, ५०४, ५०६ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. मोहिते करीत आहेत.
तसेच पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. ९ मार्च रोजी दु. २ वा. च्या सुमारास मौजे ढालघर फाटा लगत मुंबई गोवा महामार्गा लगत असलेल्या असनाज कॉम्प्लेक्स येथे फिर्यादी यांचे मालक जयराम नंदकिशोर भसीन, वय ५० वर्ष, यांना आरोपी आनंद यादव, तन्मय यादव व अनोळखी चालक रा. माणगांव यांनी हाताने मारहाण, शिवीगाळ करून अज्ञात ठिकाणी जबरदस्तीने पांढऱ्या रंगाचे कारमध्ये भरून अपहरण करून घेऊन गेले.
या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. ६१/२०२३ भा. दं. वि. सं. क. ३६५, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. सतिष आस्वर करीत आहेत.
मागील ५ वर्षांपूर्वी माणगांव नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर भसीन बिल्डर यांच्याकडुन माणगांव मुंबई गोवा महामार्गावरील माणगांव बाजारपेठ सुशोभित करून नोटांचा पाऊस देखिल पाडण्यात आला होता. मात्र दि. ९ मार्च रोजी भसीन बिल्डर आणि माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्यात नेमके काय बिनसले ? अशी चर्चा माणगांव तालुक्यातील नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.

.jpeg)

0 टिप्पण्या