समाजात चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन द्यायला हवे- प्रमुख जिल्हा न्यायाधीश शैलजा सावंत

 समाजात चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन द्यायला हवे- प्रमुख जिल्हा न्यायाधीश शैलजा सावंत


 पोलीस प्रवाह न्यूज

अलिबाग-दि. ९-  समाजात चांगले काम करणाऱ्या अनेक महिला कार्यरत असतात.  प्रसिध्दी परामुख राहून त्या काम करत राहतात. अशा महिलांचा शोध घेऊन त्यांचा सन्मानित करणे, त्यांचे काम जनसामान्यापर्यंत पोहोचवणे , त्याना प्रोत्साहन देणे महत्वाचे असते, असे मत रायगडच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा सावंत यांनी व्यक्त केले. 

अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे आदर्श नागरी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात रायगडच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा सावंत प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.  या सोहळ्याला रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, आदर्श नागरी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील आणि अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर उपस्थित होते. 

जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने कर्तृत्ववान महिलांना दरवर्षी तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण केले जाते.  पतीच्या आजारपणात ठाम उभ्या राहून कुटूंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी स्वताचा व्यवसाय सुरु करणाऱ्या सौ.राजश्री भगवान जाधव,  देहविक्री करणाऱ्या महीलांच्या पुनर्वसनासाठी झटणाऱ्या सौ. मनीषा रमेश अहिवले पवार, मुंबई मेट्रोची पहिली महिला पायलट बनण्याचा मान मिळविणाऱ्या गार्गी हरेश  ठाकूर,  कौटुंबिक वाद सामोपचाराने सोडूवून अनेक विवाहीत जोडप्यांचे संसार तुटण्यापासून वाचविणाऱ्या अ‍ॅड . गीता दर्शन म्हात्रे, योगाभ्यासात आपले करीअर घडविणाऱ्या ऐश्वर्या रवींद्र समेळ आणि रायगडची पहिली व्यवसायिक महिला वैमानिक म्हणून नावारुपास आलेली कॅप्टन  कृतज्ञा जनार्दन हाले यांना या वर्षाचे  तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

मुंबई दिल्लीतील महिलांच चांगले काम करतात असे नाही. ग्रामिण भागातील महिलाही चांगले काम करत असतात, पण त्यांचे काम लोकांपर्यंत पोहोचत नाही. तेजस्विनी पुरस्काराच्या आयोजनामुळे अशा आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांची ओळख जनसामान्यांना होत आहे. याचा आनंद होत आहे. या महिलांच्या कर्तृत्वामुळे पुरस्काराची उंची वाढत असल्याचे मत यावेळी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्यक्त केले.     

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ बैनाडे यांनी यावेळी महिला दिनाच्या आयोजना मागचा उद्देश विषद केला. पौराणिक काळापासूनच्या विवीध कालखंडातील भारतीय महिलांची वाटचाल आणि समाजातील स्थान कसे बदलत गेले, मातृसत्ताक पध्दतीकडून पितृसत्ताक कुटूंबपध्दतीकडे झालेली वाटचाल, त्याचे समाज व्यवस्थेवर झालेले परिणाम, याचे विश्लेषणही त्यांनी केले. भारतात ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. पण देशाच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यल्प आहे. विकासाच्या प्रक्रीयेत महिलांचा सहभाग वाढणार नाही. तोवर देश विकसित होणार नाही, महिलांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावणार नाही तोवर ही परिस्थिती बदलणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश सोनवडेकर यांनी केले. सुत्रसंचलन महेश पोरे यांनी तर आभार प्रदर्शन राजेश भोस्तेकर यांनी केले. या सोहळ्याला जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह अलिबागकर मोठ्या संख्येनी उपस्थित होते.   



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या