राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पनवेल येथे होणार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे भूमीपूजन
अलिबाग,दि. २५- राज्यातील युवक-युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरुपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.
या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम दि. २७ मार्च रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथे सकाळी ११ वा. महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभहस्ते करण्याचे नियोजित आहे.
या भूमीपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे मुख्य वित्त व लेखा अधिकारी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ मुंबई वि.उ.यादव यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्य कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात, एल्फिस्टन तांत्रिक महाविद्यालय, मुंबई येथे सुरु करण्यात आले आहे. दरम्यान शासनाकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथील १० एकर जागा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयाकरिता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांचे एकत्रित बांधकाम (Integrated Campus) करण्याचे प्रस्तावित आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कामकाज लवकरात लवकर सुरु करून येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना दर्जेदार कौशल्य शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून कौशल्य विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण उपलब्ध करण्याकरिता ५ कौशल्य प्रशालांची (Schools) व त्या अंतर्गत अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली असून या अभ्यासक्रमांचा शुभारंभ कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दि. ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न झाला होता.

.jpeg)


0 टिप्पण्या