उपजिल्हा रुग्णालय माणगांव आहार विभागात सावळा गोंधळ

 उपजिल्हा रुग्णालय माणगांव आहार विभागात सावळा गोंधळ.

कंत्राटदार व रुग्णालय कर्मचारी यांच्यात साटलोट?

रुग्णांच्या जीवाशी चालतोय खेळ.

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २३- माणगांव तालुका हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. याच माणगांव तालुक्यातील माणगांव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोर्बा रोडवर उपजिल्हा रुग्णालय आहे. हे रुग्णालय १०० खाटांचे असून फक्त माणगांव तालुक्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यासह पुर्ण दक्षिण रायगड मधील रुग्ण सुद्धा या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येथे येतात. परंतु, रुग्णालयात असलेल्या आहार विभागात सावळा गोंधळ सुरू असल्याचं हे उघडकीस आले आहे. एका सूज्ञ पत्रकाराने मागविलेल्या माहीती अधिकारात हे उघडकीस आले आहे. 

उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यातील काही रुग्ण हे उपचारासाठी रुग्णालयात ऍडमिट होतात. त्यांना रुग्णालया मार्फत आहार सेवा पुरवली जाते. त्याचे देय शासन संबंधित कंत्राटदारस देते. ही आहारसेवा रुग्णालयात असलेल्या आहार विभागातर्फे रुग्णालयाच्या देखरेखीखाली कंत्राटदारामार्फत पुरविले जाते. हाच आहार विभाग रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसत आहे. २०१८ पर्यत या आहार विभागात ५ कर्मचारी काम करीत होते. परंतु, सद्य स्थितीत तेथे दोनच कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसत आहे. माहिती अधिकारात मागविलेल्या महितीमध्ये ही आहार सेवा राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्था पालघर मार्फत पुरविली जाते. तसेच शासन नियमानुसार मुख्य कंत्राटदार यांनीच ही सेवा पुरवावी असे असून सुद्धा या ठिकाणी सब ठेकेदार मार्फत सेवा पुरविली जात असल्याचे दिसत आहे. तरी देखील उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी वर्ग यांच्याकडे कानाडोळा करीत आहेत. २०१८ पासून पुढे आहार विभागात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी झालेली दिसत नाही. तरी सुद्धा याच कर्मचाऱ्यांकडून आहार सेवा पुरविली जाते. तसेच शासन नियमानुसार कोणत्याही रुग्णाला त्याच्या गरजेनुसार आहार सेवा पुरविले जात नाही. मनाला वाटेल ती आहार सेवा पुरविली जात असल्याचे रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे. या पुरविल्या जाणाऱ्या आहार सेवेत वापरण्यात येणाऱ्या अन्नधान्याची त्रैमासिक तपासणी होणे अनिवार्य असताना देखील कोणत्याही प्रकारची तपासणी न करता सन २०१८ पासून आजतागायत रुग्णालयाकडून या कंत्राटदारा मार्फत रुग्णांना आहार दिला जात आहे. मात्र याच अन्नामुळे रुग्णावर विपरीत परिणाम झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे. 

 या ठिकाणी ऍडमिट झालेल्या रुग्णांपैकी बरेचसे रुग्ण रुग्णालयातील आहार न घेता घरूनच जेवण(होम डायट) घेऊन येतात. मात्र २०१८ पासून एक ही रुग्ण होम डायट नसल्याचे दाखविले गेले असून त्यांना सुद्धा आहार पुरविल्याचे दाखविले आहे. मग त्यांची बिले सुद्धा रुग्णालयाकडून कंत्राटदाराला देण्यात आली असल्याचे उघड दिसत आहे.

तसेच या रुग्णालयात २०१८ पासून लिक्विड डायट, बटरमिल्कडायट, डायबेटीक डायट, हाय प्रोटीन डायट, लहान मुले सी१, सी२, सी३, सी४ असे रुग्ण वर्गीकरण असून या रूगांणा विशेष आहार सेवा देणे हे कंत्राटदारास बंधनकारक असून २०१८ पासून आजतागायत उपजिल्हा माणगांव रुग्णालयात असे कोणतेही रुग्ण उपलब्ध नसल्याचे आहार सेवेच्या देयकासोबत असलेल्या पत्रकावर दिसत आहे. दक्षिण रायगडचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रुग्णालयात २०१८ पासून हजारो रुग्णांनी येथे औषधोपचार घेतले असून मात्र यात कोणताही विशेष रुग्ण नसल्याची ही माहीती उपजिल्हा रुग्णालयाकडून माहिती अधिकारात देण्यात आली आहे. तसेच २०१८ पासून या उपजिल्हा रुग्णालयात अपेंडिस , हरणीया, अल्सर, आतडीचे, गर्भपिशवीचे शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्ण हा एक दिवस सलाईन वर असतो तर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी लिक्वीड डाएट असतो. तरी देखील या रुग्णालयात या अनेक शस्त्रक्रिया होऊन देखील एकही लिक्वीड डाएट रुग्ण या उपजिल्हा रुग्णालयात नसल्याचे माहिती अधिकारात माहिती देण्यात आली आहे. ही बाब म्हणजे मोठी आश्चर्याची आहे. तसेच २०१८ पासून एकही विषेश रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झालेला नाही, असे देखील देण्यात आलेल्या माहिती दिसत आहे.

तसेच याबाबत येथील वैदयकीय अधीक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांच्याकडे संपर्क साधला असता संबंधित कंत्राटदार गेल्या तीन वर्षात एकदा देखील या आहार विभागाकडे फिरकला नाही, असे सांगण्यात आले आहे. तसेच संबंधित कंत्राटदारास माणगांव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी वैदयकीय अधीक्षक डॉ. पगारे यांच्यामार्फत रुग्णालयात बैठकीसाठी बोलविले असून देखील हा कंत्राटदार मनमानी कारभार करीत येऊ शकला नाही. तसेच रुग्णालयाकडून दोन वेळा लेखी पत्रक काढून देखील कंत्राटदार काडी मात्र किंमत देत नसून सरकारी अधिकाऱ्यांना देखील मानत नाही. कंत्राटदारा मार्फत जमा करण्यात आलेल्या आहार सेवेची २०१८ पासूनची बिले देखील प्रमाणित करण्यात आलेली नसून त्याला तरी देखील हे उपजिल्हा रुग्णालय या कंत्राटदारास पाठीशी घालून योग्य आहार सेवा न पुरविता सुद्धा लाखो रुपयांचे देयक देत आहे.  

लहान मुले असो की वयोवृद्ध कोणत्याही प्रकारचा रुग्ण असला तरी त्याला एकच प्रकारचे आहार पुरविले जात असल्याचे रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे. आधी ५ कर्मचारी काम करीत असताना २०१८ पासून आलेल्या कंत्राटदाराने दोन कर्मचाऱ्यांना विनाकारण कामावरून काढून टाकल्याचे समजते. त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी कंत्राटदार चाल ढकल करीत असून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. हे रूग्णालय १०० खाटा चे रूग्णालय असून या आहार विभागात फक्त दोनच कर्मचारीच काम करीत आहेत.

 कोरोना काळात या उपजिल्हा रुग्णालय माणगांव  साठी शासनाने व अनेक संस्थाने लाखो, करोडो रूपये खर्च करून पूर्णतः अद्यावत करण्यात आले. कोरोना काळात हे रूग्णालय आजूबाजूच्या तालुक्यासाठी वरदान ठरले होते.जेणेकरून कोणत्याही रुग्णांची हेळसांड होऊ नये त्यांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी अनेक सुख सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु, रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारात विभागात घोळ असल्याने सुख सुविधा उपलब्ध असल्या तरी त्याचा परिणाम रूग्णांना सहन करावा लागत आहे. आहार विभागात चाललेल्या सावळ्या गोंधळाची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना असून सुद्धा त्यांच्या कडून कोणतीही कारवाई का करण्यात येत नाही. कंत्राटदार व सरकारी कर्मचारी यांच साटलोट आहे का? असा सवाल या ठिकाणी उपस्थित होते आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या