ज्येष्ठ समाजसेवक कै. दगडू विठोबा मोरे सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १९- मानगड प्रतिष्ठान संचलित नाट्य अभिनेते भागोजी रामजी कदम ऐतिहासिक कलादालन बोरवाडी येथे ज्येष्ठ गिर्यारोहक श्रीकांत फणसळकर यांचे हस्ते " ज्येष्ठ समाजसेवक दगडू विठोबा मोरे सार्वजनिक वाचनालयाचे " उदघाटन सोहळा संपन्न झाला.
बोरवाडी परिसरातील तरूण वाचकवर्ग तसेच मानगड किल्ल्यावर येणारे पर्यटक यांना ऐतिहासिक, ललित , प्रवासवर्णन, व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विषयांवरील पुस्तक वाचण्यासाठी उपलब्ध व्हावीत या हेतूने मानगड प्रतिष्ठान बोरवाडी या संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. या वाचनालयासाठी स्वराज्य मित्र मंडळ विलेपार्ले यांचेतर्फे राजेश सावंत यांचेकडून वाचनालय कपाट देणगीस्वरूपात याप्रसंगी देण्यात आले. तसेच टीम कुर्डूगड, श्रीकांत फणसळकर, दत्ताराम पार्टे यांनी पुस्तके भेट स्वरुपात दिली.
बोरवाडी परिसरात शिक्षण, सामाजिक, सहकार क्षेत्रात विशेष योगदान दिलेले ज्येष्ठ समाजसेवक दगडू मोरे यांचे नाव वाचनालयाला दिले असून या उदघाटन कार्यक्रमाला शिरसाड ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रकांत नलावडे, सशक्त भारत संस्थेचे संजय गायकवाड, ज्येष्ठ गिर्यारोहक श्रीकांत फणसळकर, स्वराज्य मित्र मंडळाचे पदाधिकारी राजेश सावंत आणि सहकारी, पत्रकार संतोष गायकवाड, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कृतिशील शिक्षक सखाराम कदम, जनार्दन मोरे , मनोहर मोरे आणि मानगड प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष रामजी कदम उपस्थित होते.




0 टिप्पण्या