कपिल मुळे आणि संघसेन जगतकर यांना "विवेक जागर साथी पुरस्कार २०२३" जाहीर
पोलीस प्रवाह न्यूज
कोल्हापूर : दि. ८ . विवेक जागर मंचच्या वतीने चिरंतनी स्वाती कृष्णात हिच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा ‘विवेक जागर साथी पुरस्कार २०२३’ कपिल सुरेश मुळे आणि संघसेन शांता प्रल्हाद जगतकर यांना जाहीर झाला आहे. मानवताकेंद्री समाज उभारण्याकरिता संवैधानिक मुल्यांची कास धरून परिवर्तनवादी चळवळीत स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन जनमानसांत रुजाविण्याकरिता काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
कपिल मुळे हे गेली २५ वर्षे नाट्य चळवळीत लेखक, दिग्दर्शक, अभिनय, प्रकाश योजना विभागात कार्यरत आहेत. ते नाटक, चित्रपटात वावरताना सामाजिक जाणीव जागृतीसाठी प्रयत्नशील असतात. पथनाट्य, लघुपटांमधून एच.आय.व्ही./एड्स, क्षयरोग, तंबाखू दुष्परिणाम, अवयव दान, लेक वाचवा या विषयी जनजागृती करण्याचा कामातही त्यांचा सहभाग असतो. कपिल मुळे २००६ पासून ग्रामीण रुग्णालय नेसरी येथे ICTC समुपदेशक म्हणून एच.आय.व्ही./एड्स, क्षयरोग प्रतिबंधासाठी कार्यरत. यासाठी किर्लोस्कर ऑइल इंजिन च्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांच्या साह्याने घेण्यात आलेल्या 'संवेदना' कार्यक्रमातून कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातील एच.आय.व्ही./एड्स विषयी प्रबोधनपर कार्यक्रमात पुढाकार घेतला आहे. ते समाज माध्यमांतून कर्तृत्ववान महिलांचा समाजाला परिचय करून देण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय ते महिला खेळाडूंना पाठिंबा, शिवीमुक्त गाव संकल्प मोहिम या मार्गाने समाजाला दिशा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
संघसेन शांता प्रल्हाद जगतकर सध्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बिंदू चौक कोल्हापूर येथे केंद्र संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर जिल्हा विविध उपक्रम विभाग कार्यवाह या पदावर तसेच लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे संविधान संवादक म्हणून कार्यरत आहेत. ते अंधश्रद्धा निर्मूलन चमत्कार सादरीकरण, संविधान आणि आपण, आपले महामानव या विषयांवर विविध ठिकाणी संवाद करत असतात. तसेच आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र कोल्हापूर च्या वतीने आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह घडवून आणण्यात सहभाग घेत असतात. कामगार चळवळीत सक्रिय असून कामगार शिक्षणाबाबतीत ते प्रयत्नशील आहेत. त्यांना कामगार कल्याण मंडळाच्या महाराष्ट्रातील अभियानात पुणे विभागातुन गतिमानता अभियानातील उत्कृष्ट कार्य म्हणून सलग दोन वर्ष गौरव करण्यात आला आहे.
कपिल मुळे आणि संघसेन जगतकर या दोघांनीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रिंगनाटकातून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात संघटनेचे नेतृत्व केले आहे. या दोघांचा सांस्कृतिक अंगासोबतच अंनिसच्या सर्वच कामांसाठी रस्त्यावरच्या लढाईत देखील त्यांचा सहभाग असतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राबवले जाणारे विसर्जित गणेश मूर्तीदान, होळी लहान करा-पोळी दान करा, फटाकेमुक्त दिवाळी, बुवाबाजी विरोधी संघर्ष असे धर्मचिकित्सेचे उपक्रम निर्भयपणे राबवत असतानाच व्यसनमुक्ती अभियान, संविधान जागर अशा कामांत आघाडीवर राहून ते संघटनेचे प्रतिनिधित्व करत आहेत.
या दोघांनीही नाटय लेखन, नाट्य अभिनय, दिग्दर्शन व काव्यलेखन या कला प्रकारात ही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. तसेच दोघांचाही थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीत सहभाग आहे.सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रम रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे.




0 टिप्पण्या