खा.संजय राऊत यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे व उदय सामंत यांच्या होम पीचवर एंट्री! ; रत्नागिरी व सिंधुदुर्ग दौऱ्यात काय बोलणार याकडे लक्ष.
पोलीस प्रवाह न्यूज
रत्नागिरी : दि. १७ - राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे उदया कोकण दौऱ्यावर येत आहेत. कोकणात राजापूर बारसू येथे प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थक संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या केली. रत्नागिरी दौऱ्यात संजय राऊत पत्रकार वारीशे यांच्या कुटुंबाची राजपूर येथे जाऊन भेट घेणार आहेत. या दौऱ्यात राऊत कोणती भूमिका मांडतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पालकमंत्री उदय सामंत व भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री यांच्या नारायण राणे यांच्या मतदारसंघात होमपीचवर संजय राऊत दाखल होणार आहेत त्यामुळे या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिल आहे. शिवसेना नेते खा. संजय राऊत हे शुक्रवार १७ फेब्रुवारीपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ते रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होतील. दुपारी १२ वा. रत्नागिरी येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. तर दुपारी ३ वा. राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ६ वा. कणकवली येथे त्यांचे आगमन होणार आहे. यावेळी कणकवली पटवर्धन चौकात शिवसैनिकांच्यावतीने त्यांचे स्वागत केले जाणार आहे. तर शनिवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. कणकवली विजय भवन येथे संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे अशी माहिती शिवसेना कार्यालयाकडून देण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या या दौऱ्यात ते नेमके काय बोलणार? याकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका, कोकणामध्ये प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प, कोकणातील राजकीय घडामोडी या सगळ्या वरती खासदार संजय राऊत नेमकं कोणते भाष्य करतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
उद्धव ठाकरे ५ मार्च रोजी खेडमध्ये.
दरम्यान ५ मार्च रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सुपूत्र आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघात खेड येथे एन्ट्री करणार आहेत. त्या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे व याचवेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. रामदासभाई कदम यांना आव्हान देण्यासाठी दस्तूरखुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मैदानात येऊन जाहीर सभा घेणार आहेत यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडेही अनेकांच लक्ष लागून राहिल आहे.


0 टिप्पण्या