उपजिल्हा रुग्णालय माणगांवमधील सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

 उपजिल्हा रुग्णालय माणगांवमधील सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि.१८- माणगांव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून माणगांव शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. हे रुग्णालय शंभर खाटांचे असून दक्षिण रायगड मधील हजारो नागरिक या रुग्णालयात  उपचारासाठी येत असतात. कोरोना काळात तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी हे रुग्णालय वरदान ठरले होते. या रुग्णालयात सफाई, धुलाई, आहार अशा अनेक सेवा ठेकेदारामार्फत पुरविल्या जातात. या रुग्णालयात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या ३ ते ४ महिन्याचे वेतन न मिळाल्याने त्यांनी दि. १८ जानेवारी पासून काम बंद आंदोलन केले आहे.

  गेली अनेक वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे कर्मचारी कंत्राटी स्वरूपात साफ सफाई विभागात काम करीत आहेत. गेली दीड ते दोन वर्षांपासून ज्वाला नामक कंत्राटी कंपनी हे कंत्राट बघत आहे. आधी या साफ सफाई विभागात एकूण ११ कर्मचारी करीत होते. परंतु, ह्या नवीन आलेल्या कंत्राटी कंपनीने काही कारण नसताना ४ कामगारांना कामावरुन काढून टाकले असून ७ कर्मचारी आता काम करीत आहेत. कोरोना काळात सुद्धा या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली आहे. या कर्मचाऱ्यांपैकी काही जणांचे ३ महिन्यांचे तर काही जणांचे ४ महिन्यांचे वेतन ठेकेदाराने दिलेच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.  उपजिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचारी वेतन न दिल्याने दि. १८ जानेवारी पासून काम बंद केले असून तशा प्रकारचे निवेदन उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक, नगर पंचायत माणगांव नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, प्रांताधिकारी माणगांव उमेश बिरारी, जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने यांना दिले आहे. उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे या आधी जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदार निवडून त्यांना ठेका दिला जात होता. त्यावेळी अशी परिस्थिती कधी ही उदभवली नाही. मात्र जिल्ह्याबाहेरील कंत्राटदार आल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली असून अल्पशा वेतनात त्यांना राबवून घेतले जात आहे. तसेच त्यांनी आपल्या वेतनाची मागणी केली असता कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. या कर्मचाऱ्यांना कोणतीही सुरक्षा, आरोग्य विमा, इतर सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांना साफ सफाई करण्यासाठी अपुरे साधने पुरविली जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करण्यास अनेक अडथळे येत असतात अशी माहिती कर्मचाऱ्यांनी बोलताना दिली. 

उपजिल्हा रुग्णालयात रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यातील काही रुग्ण प्रसूती, शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय सेवा घेण्यासाठी रुग्णालयात ऍडमिट होत असतात. रुग्णालयातील सफाई कामगार यांनी एक दिवस काम बंद केल्याने साफ सफाई नसल्यामुळे रुग्णालयात दुर्गंधी पसरलेली दिसत होती. रुग्णांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच आहार व धोबी  विभागातील ठेका हा पालघर येथील चांदणे नावाचा कंत्राटदार  असून त्यांनी सब ठेकेदार बैलमारे याला दिले असून या सब ठेकेदार यांनी तर आहार विभागातील २ सेविकांना कामावरून काही कारण नसताना काडून टाकले आहे.  धोबी विभगातील पुरारकर यांना दर महा ६००० वेतन ठरवले होते. मात्र सप्टेंबर २०१९ पासून त्यांना आज तगायात फक्त पंधरा हजार रुपये देण्यात आले असून उर्वरित पैसे मागितले असता उडवाउडवीची उत्तरे देत आहे.  त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांना न्याय देऊन रुग्णांची हेळसांड होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या वेळी सफाई कामगारांनी सांगितले की, गेले ३ वर्ष आम्हाला कधीही वेतन वेळेत मिळालेले नाही. आणि ३ वर्षात एक ही रुपया वेतन वाढ मिळाली नाही. वेतन वाढ मागितली असता आम्हाला कामावरून काढण्याची धम्मकी देण्यात येते. तसेच आमचीउपासमारीची वेळ आल्याने आम्ही काम बंद करीत आहोत. तसेच आम्हाला शासनाने  जिल्हा बाहेरील कंत्राटदार न देता आम्हला स्थानिक कंत्राटदार द्यावा अशी मागणी सफाई, आहार व धोबी विभागातील कर्मचारी यांनी केली असून आम्हाला काही झाले अथवा जीवित हानी झाल्यास याला सर्वस्वी हा ठेकेदार, सब ठेकेदार व उपजिल्हा रुग्णालय  जबाबदार असेल असे पत्रकारांना बोलतांना या कर्मचारी वर्गानी सांगितले. तसेच नथुराम चांदोरकर यांना देखील कोरोना काळात धोबी विभागात केलेल्या कामाचा एक वर्षाचा पगार देखील बैलमारे या कंत्राटदाराने न देता कामावरून काढून टाकले आहे. 

 या निवेदनाची दखल घेत माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार समवेत उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, नगरसेवक कपिल गायकवाड, स्वच्छता सभापती अजित तार्लेकर, नगरसेवक दिनेश रातवडकर, पाणी पुरवठा सभापती राजेश मेहता यांनी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे येऊन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक गोमसाळे यांना भेटून संबधित कंत्राटदार यांना संपर्क साधून ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे. त्यांना कामावर घेण्यात यावी तसेच संबधित मूळ ठेकेदार यांना कर्मचारी वर्गाचे वेतेन देता येत नसेल तर या कांत्राटदार यांचा ठेका रद्द करा आम्ही येथील स्थानिक ठेकेदार देऊ असे सांगितले.

उपजिल्हा रुग्णालयात ही वेळोवेळी परस्थिती उद्भवत असेल तर आरोग्य विभागांनी याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. अन्यथा एखाद्या कर्मचाऱ्याचे जीव गेल्यावर आरोग्य विभागाला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर कर्मचाऱ्यांची संबधित कंत्राटदार वेळोवेळी हेळसांड करीत असेल तर या ठेकेदाराचा ठेका रद्द करून सक्षम ठेकेदार नियुक्त करावा. मात्र अशा परिस्थितीतकडे उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य विभाग का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल नागरिक करीत आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या