खरवली येथे मानवी हक्क दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन
माणगांव-दि. १०- समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, तसेच या व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी दि. १० डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दि. १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. जगभरातील लोकांना मानवाधिकाराकडे आकर्षित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने १९५० मध्ये १० डिसेंबर हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून घोषीत केला. तेव्हापासून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. माणगांव तालुक्यातील खरवली येथे दि. १० डिसेंबर रोजी मानवी हक्क दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
तहसील कार्यालय माणगांव व नूतन माध्यमिक विद्यालय खरवली यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी व तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी कार्यालय खरवलीचे तलाठी अमित उजगरे यांच्या पुढाकाराने खरवली येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण खरवली गावातून प्रभात फेरी काढून मानवी हक्क दिनाबद्दल जनजागृती करण्यात आली.
यावेळी इंदापूर मंडळ अधिकारी विश्वास गडदे, तलाठी अमित उजगरे, नूतन माध्यमिक विद्यालय खरवली मुख्याध्यापक गुळवणी, शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिक्षिका गुळवणी यांनी मानवी हक्क दिनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.




0 टिप्पण्या