खा. सुनील तटकरे यांनी घेतला विळे भागाड औद्योगिक क्षेत्राचा आढावा
कंपनी अधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर
माणगाव-दि. १९- रायगड रत्नागिरी लोकसभेचे खा. सुनील तटकरे यांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी विळे भागाड औद्योगिक क्षेत्राचा आढावा घेतला. माणगांव तहसील कार्यालय येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत विविध कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना खा. तटकरे यांनी चांगले धाऱ्यावर धरले.
विळे भागाड औद्योगिक क्षेत्र मंजूर झाल्यानंतर तिथे अनेक कंपन्याना जागा देण्यात आल्या. विळे, भागाड, तासगाव, येलावडे, सणसवाडी ई. आजूबाजूच्या गावातील जागा विळे भागाड औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आल्या. औद्योगिक क्षेत्र झाल्यामुळे भविष्यात स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल व आजूबाजूच्या परिसराचा विकास होईल या हेतूने स्थानिकांनी जागा दिल्या. काही वर्षांपूर्वी या भागात विविध कंपन्या सुरू झाल्या. कालांतराने स्थानिकांना न्याय मिळत नसल्याने अनेक मोर्चे, वाद निर्माण झाले. काही कंपन्यामध्ये अपघात सुद्धा झाले. विळे भागाड औद्योगिक क्षेत्र नेहमीच चर्चेचा विषय ठरला.
या सुनिल तटकरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पोस्को, जेटीएल, आयनॉक्स, ग्लासवन, युनिटी फोर्निस, जिंदाल प्रायव्हेट लिमिटेड, लोटस लिमिटेड ई. कंपन्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. खा. तटकरे यांनी आढावा घेतला असता विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य खूप कमी प्रमाणात आढळून आले. कामगारांचे पगार अल्प प्रमाणात असून त्यांची काम करण्याची वेळ खूप जास्त आहे. कामगार कायद्यानुसार ८ तास ड्युटी असून काही कंपन्यांमध्ये १२ तास ड्युटी चालत असल्याचे समजले. ठेकेदार सुद्धा स्थानिक नसून बाहेरील असल्याचे ही उघडकीस आले. एकंदरीत विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या अनेक त्रुटी समोर आल्याने खा. तटकरे यांनी कंपनी अधिकाऱ्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले. खा. तटकरे यांनी सर्वांना खडे बोल सुनावून स्थानिकांना प्राधान्य द्या. कामगार कायद्यानुसार कंपन्या चालवा. जे कायदा मोडत असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना यावेळी खा. तटकरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. योग्य तो बदल लवकरात लवकर कंपन्यांनी न केल्यास कठोर पावले उचलण्यात येतील अशा इशारा ही यावेळी खा तटकरे यांनी दिला.
या बैठकीला खा. सुनील तटकरे यांसह प्रांताधिकारी उमेश बिरारी, तहसीलदार प्रियांका आयरे, मा. ता. रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, महाड माणगांव विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर खानविलकर, मा. नगराध्यक्ष आनंद यादव, युवक सचिव दिपक जाधव, कामगार, प्रदूषण विभाग अधिकारी, विळे भागाड स्थानिक, ई उपस्थित होते.



0 टिप्पण्या