कोकण रेल्वे मडगांव स्पेशल ट्रेन खाली रान गव्याचा दुर्दैवी मृत्यु
ट्रेन अपघाती मृत गव्याला अक्षरशः कापून ट्रेनच्या बफर जॉइंण्ट मधून बाहेर काढले
माणगाव- दि. ९- संगमेश्वर स्टेशन वरून चिपळूण च्या दिशेने जाणाऱ्या कोकण रेल्वेला मंगळवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०६ .०० वाजताचे सुमारास अपघात झाला आहे. संगमेश्वर आणि कडवई रेल्वे ट्रॅक वर पोल नंबर १६७/१४ ट्रेन नंबर १११०० मडगांव एलटीटी डबल डेकर स्पेशलच्या समोर ट्रॅकवर रान गवां आडवा येऊन अपघात झाला. बोगद्याच्या अलिकडे हा अर्धगोलाकार शिंग तोंडावर केस असलेला मोठा गवा गाडीच्या समोर आडवा आला आणि इंजिनमध्ये अडकल्याने तो दुर्दैवी मृत्युमुखी पडला.
अपघाती सापडलेला हा गवा ट्रेनच्या बफर जॉइंण्ट मध्ये अडकला तो मोटरमनला दिसत नव्हता, एखाद वेळेस तो निघुन गेला असेल असे मोटरमनला वाटले मात्र ट्रॅकवरील खडी उडत आवाज येत असल्याचे लक्षात आल्याने ब्रेक लावुन ट्रेन थांबविण्यात आली. बोगद्या पलिकडे जवळपास पाचशे मिटर त्याला फरफटत नेले. या ट्रेनचे १७ ही डब्बे प्रवास्यांनी गच्च भरलेले होते परंतु सुदैवाने धोका टळला. ट्रेन मधिल प्रवासी, मोटरमन आणि गार्डच्या मोठ्या मेहनतीने या मृत गव्याला बाजुला काढण्यात यश आल्यानंतर ०७.२० वाजता ट्रेन येथुन पुन्हा सुखरुप मार्गस्थ झाली.
निर्मनुष्य ठिकाणी हा अपघात झाल्याने ट्रेन काळोखात थांबली शेवटचा १७ वा डबा बोगद्यात राहिल्यामुळे टॉर्च लाईट इथपर्यंत पोहोचतच नव्हती अश्या बिकट अवस्थेत पाठच्या डब्यातील प्रवाश्यांना गाडी का थांबली? काहीच कळेनासे झाले. या ठिकाणी ट्रेन मधिल प्रत्यक्षदर्शी प्रवासी मंगेश निगडे व केतन वारुगसे यांनी ही सर्व घटना रायगड जिल्ह्यातील पत्रकार मित्र रविंद्र कुवेसकर यांच्याजवळ संपर्क करुन सांगितली कारण येथुन कोणाची मदत मिळणार असा प्रश्न त्यांना पडला होता, रेल्वे प्रशासनाचा हेल्पलाईन नंबर मिळेल का अशी विनंती आमचे जवळ केली असता पत्रकार कुवेसकर यांनी लगेचच माणगांव पोलीसांना सदरची घटना सांगितली.
माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांनी रत्नागिरी कंट्रोल पोलीसांचा नंबर दिला त्यावर मंगेश निगडे यांनी संपर्क करताच कंट्रोल पोलीसांनी संबंधितांना कळवलं, ट्रेनच्या मोटरमन आणि गार्ड नेही संपर्क करुन तस कळवलं होत, कडवई रेल्वे स्टेशनचे स्टेशन इंन्चार्ज व ४ जणांचा स्टाफ, २० ते २५ मिनिटातच ट्रॅक वरून पायी चालत येथे पोहोचले. विशेष म्हणजे याच ट्रेन मधिल प्रवासी १४ वर्षाच्या दीप मंगेश निगडे हा मुलगा, मोटरमन आणि गार्ड यांना काळोखात टॉर्च दाखवून सहकार्य करीत होता तर ट्रेन मधिलच प्रवासी आकाश अशोक दळवी यांनी नाईलाजास्तव त्या मृत गव्याला अक्षरशहा कापूनच ट्रेनच्या बफर जॉइंण्ट मधून बाहेर काढले. सव्वातासाच्या कठीण प्रयासाने हे अवघड ऑपरेशन पूर्ण केलं गेलं. या कामी सर्वांचे सहकार्य उत्तम रित्या लाभल्याने गाडीतील प्रवास्यांना हायसे वाटले व अखेर ट्रेन ०७.२० वाजता येथुन मार्गस्थ झाली आहे. याबद्दल कोकण रेल्वे आणि पोलीस तसेच पत्रकार मित्राचे रेल्वे प्रवास्यांनी आभार व्यक्त केले आहेत.




0 टिप्पण्या