माणगांवात जिवाजी महाले जन्मोत्सव सोहळा संपन्न

 माणगांवात जिवाजी महाले जन्मोत्सव सोहळा संपन्न 

पोलीस प्रवाह न्यूज

माणगाव-दि. १०-माणगांव नाभिक समाज संघटनेतर्फे माणगांवात प्रथमच "शिवरत्न वीर जिवाजी महाले" यांच्या जन्मोत्सव सोहळा रविवार दि.९ ऑक्टोबर रोजी कुणबी भवन येथे संपन्न झाला.   यावेळी शिवसेना नेते ऍड. राजीव साबळे, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, नगरसेवक कपिल गायकवाड, नगरसेविका सुविधा खैरे, रश्मी मुंढे, ममता थोरे, रत्नाकर उभारे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष सुदाम शिंदे,  विश्वस्त भाऊ पांडे, शिर्के गुरुजी, विलास यादव आदी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

पहिल्यांदाच नाभिक समाजाच्या वतीने बहुजन समाजातील आबाल-वृध्द, महिला-पुरुष सर्वांसाठी "शिवरत्न जिवाजी महाले" यांचे स्मरण, इतिहास आणि शौर्याबाबत जनजागृतीपर माहीती दिली.  ऐतिहासिक काळी युध्द कौशल्याचे बाळकडु ज्या प्रशिक्षणातुन दिले जायचे, तसेच त्याकाळी वापरात येणारी शस्त्र, दांडपट्टा, तलवारबाजी, काठी फिरविणे या साहसी खेळांचे प्रात्यक्षिकही या कार्यक्रमाचे निमीत्ताने रायगडच्या खोऱ्यातील बिरवाडी गावचे तरबेज युवा मित्रमंडळातर्फे करण्यात आले. 

शिवरायांनी अफजल खानाचा वध करते वेळी त्यांचे अतिविश्वासु आणि जवळचे अंगरक्षक शिवरत्न वीर जीवा महाले यांची ती ऐतिहासिक गोष्ट आपल्यासमोर आपसुकच येते. त्या काळापासून असं म्हटलं जायचं "होता जीवा म्हणून वाचला शिवा" कारणही तसच होतं. छत्रपती शिवरायांनी खानाचा वध केला त्याप्रसंगी पाठीमागून हल्ला करणारा खानाचा चलाख अंगरक्षक सय्यद बंडा याला क्षणाचाही विलंब न करता आस्मान दाखवुन यमसदनी पाठविणारे  शिवरायांचे अंगरक्षक जीवा महाले होते. तेव्हा पासून "होता जीवा म्हणून वाचला शिवा" अशी ओळख निर्माण झाली. स्वराज्याची धुरा ज्यांनी तळहातावरील फोडाप्रमाणे जपत स्वतःच्या खांद्यावर घेत वेळप्रसंगी मृत्यूलाही सामोरे गेले. अशा अनेक मावळ्यांच्या कर्तृत्वातुनच शिवरायांनी भुमिपुत्रांचे हिंदवी स्वराज्य उभे केले. त्यापैकी एक वीर योद्धा म्हणजेच शूरवीर जिवाजी महाले होत. अशा वीर जिवा महाले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमा द्वारे ऐतिहासिक चित्तथरारक साहसी खेळांचे प्रात्यक्षिक माणगांवकरांना पाहायला मिळाले. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या