बिबट (वाघ) नखे विकणारी टोळी गजाआड; वनविभाग व माणगांव पोलिसांची दमदार कामगिरी.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २३ वन्यजीवांची हत्या करून अवयवांची तस्करी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या अवयवांना बाजारपेठेत चांगला मोबदला मिळत असल्याने अनेक टोळ्या वन्यजीवांची हत्या करून तस्करी करीत आहेत. अशीच बिबट नख्यांची विक्री करीत असताना टोळीतील ४ आरोपी व १० बिबट नखे वनविभाग माणगांव व माणगांव पोलिसांनी गजाआड केली आहेत.
सविस्तरपणे वृत्त असे की, दि. २१ सप्टेंबर रोजी माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील कुंभार्ते गावच्या हद्दीत पोलीस व वनविभागाच्या संयुक्त कारवाई दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी मंगेश लक्ष्मण कुर्मे, वय ४५ वर्ष, रा. निजामपूर बोरवाडी रोड व नईम अजीज शेख, वय ३२ वर्ष, रा. निजामपूर बोरवाडी रोड यांना १० बिबट नखे विकत असताना वनविभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. उर्वरित आरोपी दत्ता अनंत पवार, वय २२ वर्ष, रा. बेलवाडी कांदले, रोहा व मंगेश गिरीजा पवार, वय ३५ वर्ष, रा. गारबट वाडी, रोहा याना दि. २२ सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सदर आरोपीं विरोधात रा.गु.नं. डब्ल्यु.एल.एफ. ०१/सन २०२२-२३ गुन्हेप्रकरणी पकडुन त्यांचेविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २, ९, ३९, ४९ व ५१ चे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा नोंदवून आरोपी यांना मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माणगांव यांचे कोर्टात हजर केले असता त्यांना दि. २६ सप्टेंबर पर्यंत वन कस्टडी देण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये वनक्षेत्रपाल माणगांव अनिरुद्ध ढगे, वनपाल निजामपूर संजय चव्हाण, वनरक्षक अशोक कोकडे, जर्मनसिंग पाडावी, अक्षय मोरे, वनपाल ज्ञानदेव सुभेदार, वन क्षेत्र लेखापाल हरेंद्र पालकर, वनरक्षक वैशाली मोरे, चालक विवेक जाधव, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक सतिश अस्वार, पो. शि. शाम शिंदे, मिलिंद खिरीट, दहिफळे, मिसाळ, पाटील यांनी कामगिरी पार पाडली. पुढील तपास उप वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अनिरुद्ध ढगे करीत आहेत.




0 टिप्पण्या