ना. गडकरी यांचे मुंबई गोवा महामार्ग येत्या वर्षाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन.

मुंबई गोवा महामार्ग हा हृदयमार्ग आहे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. ३- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव म्हसळा दिघी पोर्ट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ साखळी क्रमांक ० ते ५४७५० काँक्रीटीकरण बाजूपट्टीसह दुहेरीकरण करणे, इंदापूर तळा आगरदांडा महामार्ग क्रमांक ५४८ अ मधील साखळी क्रमांक ० ते ४२,३४५ लांबीचे काँक्रीटीकरण बाजूपट्टीसह  दुहेरीकरण करणे तसेच पुणे रायगड जिल्हा सीमा ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग ७५३ साखळी क्र.६९ ते १०३ लांबीचे काँक्रीटीकरण बाजूपट्टीसह  दुहेरीकरण करणे याचा लोकार्पण व रा. म. क्र. ६६ कासु ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा भूमिपूजन सोहळा रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदापूर येथे पार पडला. मुंबई गोवा महामार्ग हा हृदयमार्ग आहे.  मुंबई गोवा महामार्ग येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे आश्वासन ना. गडकरी यांनी दिले. 

पुढे ते म्हणाले की, मी बांधकाम मंत्री असताना कोकणातील १८ सागरी महामार्ग बांधून पूर्ण केले आहेत. आदिती तटकरे यांनी मागणी केलेल्या सागरी महामार्गचा भारतमाला २ मध्ये समावेश करून पूर्ण करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांच आपल्या आयुष्यातील स्थान  आईवडिलांपेक्षा मोठं आहे. त्यांच्या गडकिल्यांच्या बाबतीतील सर्व प्रस्ताव मी मंजूर करून देईन. शासकीय जमीन वापरून ट्रक टर्मिनल्स उभारण्यात येतील. पुणे ते जे. एन. पी. टी. रेल्वेलाईन काढण्याची गरज आहे. कोळी बांधवांसाठी १०० नॉटिकल आत जाणारे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. ते कोकणातील कोळी बांधवांना दिल्यास ब्लू इकॉनॉमिमुळे कोकणात समृद्धता व संपन्नता येईल. मुंबई गोवा महामार्गासाठी १८ हजार कोटी रु. खर्च करण्यात येत आहे. कोकणाच्या विकासात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही. भूसंपादन करण्यास जर अडचण येत नसेल तर अंतर्गत रस्ते सुद्धा बांधून देण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले. खा. सुनील तटकरे यांच्यामुळे कोकणात येण्याची संधी मिळाली त्याबाबद्दल त्याचे ना. गडकरी यांनी आभार मानले. 

 या सोहळ्याला राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, आ. अनिकेत तटकरे, आ. भरत गोगावले, आ. रवींद्र पाटील, माजी पालकमंत्री तथा आ. रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय मुख्य अभियंता तथा क्षेत्रीय अधिकारी राजीव सिंह, राज्य महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्गाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

ट्रक टर्मिनलची सुविधा जर उपलब्ध झाली तर या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी होईल असे निवेदन पालकमंत्री आदीती तटकरे यांच्याकडून नाम गडकरींना देण्यात आले. ना. आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की,  रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम चालू आहे.  त्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे ब्रिज उभारण्यात आलेले आहेत. त्याच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात होणारे ब्रिज मनासारखे झाले नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना आपल्याकडून सूचना देण्यात आल्या तर त्या कामात सुधारणा होऊ शकते असे  मत ना. आदीती तटकरे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर वाकण पाली खोपोली मार्गावरील वन विभागाच्या जमिनीचा प्रश्न सोडविला गेल्यास पाली खोपोली महामार्गाचे काम देखील वेळेत पूर्ण होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी महामार्गाचे काम झाले आहे. त्यालगत असणाऱ्या गावाना आज वाहतुकीची प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामध्ये देखील सुधारणा झाल्यास महामार्गालगतच्या ग्रामस्थांना भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत. शरद पवार साहेबांचे कार्य आम्ही ज्याप्रमाणे पाहत असतो त्याचप्रमाणे  तुमच्या कार्यातून देखील आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीना प्रेरणा मिळत असते. ज्यावेळी राज्याचा विकासाचा व स्वतः च्या गावच्या विकासाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी राजकारणविरहीत कसे काम करावे? ते तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळत असते. आपण मागील खूप वर्षात केलेली कामे राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहेत अशी स्तुतीसुमने पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी ना. नितीन गडकरी यांच्यावर उधळली.

या वेळी खासदार सुनिल तटकरे म्हणाले सुमारे १ हजार कोटी खर्चाच्या कामाचे लोकार्पण,आज करण्यात आले. या देशाचे कर्तबगार नेते, देशाचे प्रश्न आक्रमक पणे सोडवणारे नेते केंद्रीय मंत्री नाम नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. कोकणवासीयांना या रस्त्याची प्रतीक्षा होती. या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण झाली होती. गेली २५ वर्षे मी महाराष्ट्र च्या व देशाच्या राजकारणात सक्रिय पणे काम करीत आहे. नाम नितीन गडकरी यांच्या सारखी काम करण्याची वृत्ती कोणत्याही केंद्रीय नेत्यामध्ये पहिली नाही. राज्याच्या बजेट मध्ये सर्व कामे होऊ शकत नाहीत, त्याकरीता स्वतंत्र महामंडळ असावे या दृष्टिकोनातुन MSRDC ची स्थापना नाम.नितीन गडकरी यांनी केली. नितीन गडकरी म्हणजे दिल्लीतील महाराष्ट्राचा अभिमान आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील नाम नितीन गडकरी यांच्या मुळेच पूर्णत्वास गेला आहे. अनेक रस्त्याना गडकरींच्या माध्यमातून महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. एवढेच नाही तर निधी उपलब्ध देखील करून कामे पूर्ण करून दाखविली आहेत. यामूळे गडकरी साहेबांची ओळख गडकरी म्हणून नव्हे तर रोडकरी म्हणून देखील निर्माण झाली आहे. आपल्यामुळे कोकणातील विकसित होणाऱ्या दळण-वळणामुळे पर्यटन व्यवसाय देखील विकसनशीलतेच्या मार्गावर आहे. या सर्व कामामुळे कोकणवासीय गडकरी साहेबांना कधीच विसरणार नाही. देशातील दळण-वळणाच्या जडणघडणीत जिथे पर्यन्त चंद्र सूर्य तारे आहेत ,तोपर्यंत नाम. नितीन गडकरी यांचे नाव राहणार आहे.असे गौरवोद्गार खासदार सुनिल तटकरे यांनी नाम नितीन गडकरींच्या बाबतीत काढले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या