स्वयंसिद्धा संस्थेने "आपला महाराष्ट्र, आपले सरकार" या पथनाट्यातून केली योजनांची जनजागृती.

 



पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव : दि. १७ - माणगाव बस स्थानक येथे महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड- अलिबाग व मनोज शिवाजी सानप- जिल्हा माहिती अधिकारी रायगड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व प्रियांका अहिरे- तहसीलदार, माणगाव यांच्या  सहकार्याने माणगाव बस स्थानक, भाजी मार्केट माणगाव व इंदापूर बस स्थानक या ठिकाणी शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लोककलेच्या माध्यमातून जागर करण्यात आला. स्वयंसिद्धा संस्थेच्या कलाकारांच्या वतीने मागेल त्याला शेततळे हे शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना सुरू करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, फळबाग लागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, शिव भोजन योजना, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा रेवस ते जेट्टी सागरी महामार्ग चौपद्री व दुपद्री सुधारणा हा प्रकल्प, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी करिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना,पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंत चे कर्ज बिनव्याजी देण्याची योजना, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपलं शासनाने शेतकऱ्यांना केलेली मदत, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना अशा विविध योजनांची जनजागृती करण्यात आली.

 
रायगड जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी आपले जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गरुड झेप स्पर्धा परीक्षा, केंद्र सुरू केले. आपल्या रायगड जिल्ह्यात उसर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे त्याचबरोबर 500 खाटांचे रुग्णालय देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात येणार आहे. अशा अनेक योजनांची माहिती देखील पथनाट्यातून उपस्थितांना देण्यात आली. यावेळी पोलीस सहकारी अस्मिता म्हात्रे, अमिता गुंड उपस्थित होते.या पथनाट्याचे नेतृत्व स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता काशिनाथ साळवी करीत असून सदर पथनाट्यात दहा कलाकार सहभागी झाले होते. या पथनाट्यातून रायगड जिल्ह्यातील 21 ठिकाणी दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे सुचिता साळवी यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या