वडिलांच्या निधनाची वार्ता समजली तरी लढवय्या गणेशने धीराने दिला बारावीचा पेपर
कागल प्रतिनिधी/ओंकार पोतदार :
वडील मुरगुड नगरपालिकेतील रोजंदारीवर सफाई कर्मचारी तर गणेश एका झेरॉक्स सेंटर मध्ये काम करत शिक्षण घेणारा विद्यार्थी. आज गणेश वर मात्र आभाळच कोसळले. गणेश च्या वडिलांचे कोल्हापुरात निधन झाल्याचे वृत्त येऊन धडकले मात्र शिक्षकांनी धीर दिल्याने परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या लढवय्या गणेश ने पहिल्यांदा बारावीचा पेपर दिला आणि नंतर घरी येऊन वडिलांवर अंत्यसंस्कार केले. गणेश परीक्षा देऊन बाहेर पडताच कोल्हापूरहून आणलेल्या मृतदेहावर कोसळत धाय मोकलून रडू लागला. यावेळी उपस्थितांना देखील गहिवरून आले.
मुरगूड येथील शिवराज ज्युनियर कॉलेजमध्ये १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या गणेश महादेव कांबळे या परीक्षार्थ्याचे वडील महादेव गणपती कांबळे (वय वर्षे ६४ ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. कोल्हापुरात उपचार चालू असताना महादेव कांबळे हे मयत झाल्याची माहिती घरात मिळताच अकस्मात झालेल्या निधनाने घर शोकसागरात बुडाले. मयत महादेव यांचा मुलगा गणेश यांने बारावी परीक्षेमध्ये इंग्रजीचा पहिला पेपर दिला होता. वडील मयत झाल्याची बातमी समजताच गणेशवर आभाळ कोसळले. आज गणेशचा भौतिकशास्त्र हा विज्ञान शाखेतील अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा पेपर होता. मृतदेहाची सर्वजण प्रतीक्षा करत थांबले होते. परीक्षेची वेळ झाल्याने शाळेतच परीक्षा असल्यामुळे हा विद्यार्थी न आल्याची वर्ग शिक्षक उदय शेटे यांना माहिती समजताच त्यांनी चौकशी सुरू केली असता गणेशचे वडील मयत झाल्याची माहिती मिळाली. तातडीने घराशी संपर्क साधून माहिती घेतली असता गणेश पेपर देण्याच्या मनस्थितीत नव्हता. वर्गशिक्षक उदय शेटे तसेच अमर पवार, राजू कांबळे यांनी गणेशची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याचे सांत्वन करत समजुतीचे चार शब्द सांगितले. धीरगंभीर व अत्यंत शोकाकूल अशा वातावरणातच परीक्षेसाठी पेन हाती घेऊन गणेश परीक्षा गृहाकडे चालता झाला.
परीक्षागृहात तो प्रवेश करताना साऱ्यांचेच ऱ्हदय गहिवरले. परीक्षागृहात साडेतीन तास थांबून गणेशने शांतचित्ताने पेपर सोडवला. मुलाची परीक्षा पूर्ण होण्यासाठी तिकडे कोल्हापुरातील इस्पितळात वडील महादेव कांबळे यांचा मृतदेह तब्बल तीन तास थांबवून ठेवण्यात आला. गणेश परीक्षा देऊन परीक्षा गृहातून बाहेर पडताच कोल्हापूरहून आणलेल्या मृतदेहावर कोसळत धाय मोकलून रडू लागला. त्यामुळे सर्वांनाच हुंदका फुटला. अत्यंत शोकाकूल वातावरणात महादेव कांबळे यांच्यावर करण्यात आले.
मयत महादेव कांबळे हे मुरगूड पालिकेकडे रोजंदारीवर सफाई कामगार म्हणून सेवा बजावतात. तर गणेश हा बारावी शिकतच शहरातील एका झेरॉक्स सेंटरमध्ये सकाळी कॉलेज संपल्यानंतर कामाला असतो.

0 टिप्पण्या