पोलीस प्रवाह न्यूज
रायगड: दि. २६ - माणगांव तालुक्यातील रायगडकडून माणगांवकडे येणाऱ्या रोडला घरोशी वाडी ते कडापूर दरम्यान तीव्र उतार वळणाला ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात होऊन १ मयत झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. २६ नोव्हेंबर रोजी ट्रॅव्हल्स बस क्र. एम. एच. ०४ एफ. के. ७७९९ ही रायगडवरून माणगांव बाजूकडे येत असताना घरोशी वाडी ते कडापूर गाव दरम्यान दुपारी ३.३० वा. ते ४ वा. च्या सुमारास आल्यावेळी ट्रॅव्हल्स बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. अपघात झाल्याची माहिती मिळताच माणगांव पोलीस तातडीने फौजफाट्या सह घटनास्थळी दाखल झाले. तसेच शासकीय व खाजगी रुग्णवाहिका धाव घेत घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस वाहन व रुग्णवाहिके मधून जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले. सदर बसमधील प्रवाशी हे कर्जत येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बसमध्ये एकूण ४० प्रवाशी होते. या अपघातामध्ये वाहनचालक विजू भगवान नागरे वय २४ जागीच मयत झाला असून २१ जण गंभीर तर १८ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सदर बसमधील गंभीर जखमींमध्ये ९ स्त्रिया, ३ पुरुष, ६ मुले, ३ मुली तर किरकोळ जखमींमध्ये २ पुरुष, १० स्त्रिया, ६ लहान मुले यांचा समावेश आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले असून किरकोळ जखमींवर उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे उपचार सुरू आहेत. रोडला लागून असलेल्या संरक्षक कठड्यावर जाऊन बस अडकली. जर संरक्षक कठडा नसता तर बस खाली आदळून मोठा अनर्थ घडला असता. अपघाताचा पुढील तपास माणगांव पोलीस करीत आहेत.

0 टिप्पण्या