रायगड: दि. २९ - माणगांव तालुक्यात बोर्ले गावातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना मागील ३ दिवसांपूर्वी (२६ ऑक्टोबर)रोजी घडली होती. माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे होते की, दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास मु. पो. बोर्ले ता. माणगांव येथील फिर्यादी सुनिल बारीकराव यादव यांच्या घरासमोरील अंगणातून आरोपी संतोष अशोक यादव, वय ३० वर्ष, रा. मु. पो. बोर्ले, ता. माणगांव याने त्यांच्या लाल काळ्या रंगाच्या होंडा शाईन गाडी क्र. एम. एच. ०६ बी एक्स ८८२४ वरून फेरफटका मारण्याच्या निमित्ताने अल्पवयीन मुलगा कु. रुद्र अरुण यादव, वय २ वर्ष ३ महिने याला त्यांचा अज्ञातपणाचा फायदा घेऊन पालकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने पळवून नेले होते.
या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. २३०/२०२१ भा. दं. वि. सं. क. ३६३ प्रमाणे करण्यात आली होती. वरील वर्णनाचा मुलगा कोठे आढळल्यास माणगांव पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवाहन माणगांव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी केले होते.
सदर आरोपी संतोष यादव याला शोधण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. मात्र दुर्दैवी घटना अशी की, दोन वर्षाच्या छोट्या रुद्र ला या नराधमाने मारून रोहा तालुक्यातील(चणेरा)रोडवर आरे गावच्या हद्दीत मारून टाकण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना माणगाव तालुक्यातील मोर्बे ग्रामपंचायत हद्दीतील बोर्ले गावात घडली आहे. आरोपीला पोलिसांनी वापी म्हणजेच महाराष्ट्र राज्य सीमारेषेवरून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

0 टिप्पण्या