पिंपरी (प्रतिनिधी):
पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने शहरातील जगताप डेअरी, विशालनगर येथील एका गोदामावर छापा टाकून तब्बल 11 लाख 27 हजार 646 रुपये किमतीचा गुटख्याचा साठा व इतर मुद्देमाल जप्त केला. शनिवारी सकाळी पावणे सात वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एका इसमावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.
शहरात गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा सुरू होती.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील अवैद्य धंदे बंद करण्या बाबत वारंवार सूचना दिल्या आहेत.स्थानिक पोलीस स्टेशनकडून याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे समोर आल्याने त्यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून कारवाई सुरू केली आहे.शहरातील विविध अवैद्य धंदे बंद करण्यात आले आहेत.छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या व्यक्तींवर आता करडी नजर ठेवली जाणार असल्याने शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांना आता चपराक बसणार आहे.
आज केलेल्या कारवाईत अशोक नाराराम चौधरी ( वय -45, रा. विशालनगर, जगताप डेअरी), असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशानुसार सामाजिक सुरक्षा पथकाकडून शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरु केली आहे.विशालनगर येथील एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची माहिती खबऱ्यामार्फत सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली.
त्यानुसार या पथकाने विशाल नगर येथील अशोक चौधरी याच्यागोदामावर छापा टाकला. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा केला असल्याचे पथकाच्या निर्दशनास आले.या कारवाईत पोलिसांनी 4 लाख 3 हजार 200 रुपये किमतीचा रसिकालाल माणिकचंद आरएमडी पान मसाला, 2 लाख 68 हजार रुपये किमतीचा रसिकालाल माणिकचंद आरएमडी तंबाखू मसाला, 58 हजार 344 रुपये किमतीचा केशरयुक्त विमल पान मसाला, 48 हजार 960 रुपये किमतीचा केशरयुक्त पान मसाला, 10 हजार 296 रुपये किमतीची तंबाखू, 12 हजार 480 रुपये किमतीची वि-1तंबाखू, 3 हजार 96 रुपयांचा रजनीगंधा सुगंधित पान मसाला, साडे सहा हजारांची गोवा 1000चे पाकिटे, 4 लाख 10 हजारांची मारुती सुझकी कंपनीची कार, पाच हजारांचा मोबाईल आणि 1770 रुपयांची रोकड, असा एकूण 11 लाख 27 हजार 646 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाशाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धर्यशिल सोळंके, विजय कांबळे,सुनिल सिरसाट, नितीन लोंढे,भगवंत मुळे,अनिल महाजन, अमोल शिद, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, योगेश तिडके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


0 टिप्पण्या