परिज्ञान परिवारतर्फे माणगांव तालुक्यात दिवाळीनिमित्त सौरदिव्यांची भेट

पोलीस प्रवाह न्यूज़

माणगांव: दि १८ - मुंबई येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. उदय अंदार यांच्या परिज्ञान परिवार संस्थेतर्फे संस्थेचे स्वयंसेवक अजय नाडकर्णी आणि तेजस जानस्कर यांच्या प्रयत्नांतून माणगांव तालुक्यातील वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्या मार्फत तालुक्यातील काही गावांमध्ये परिचयाच्या निवडक लोकांना तसेच आदिवासी कुटुंबांना दिवाळीनिमित्त व याआधी निसर्ग चक्रीवादळानंतर सौरऊर्जित दिव्यांची भेट देण्यात आली आहे.

परिज्ञान परिवार संस्थेने निसर्ग चक्रीवादळापासून रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सौरऊर्जित दिव्यांचे वाटप केले असून लोकांपर्यंत मोफत ऊर्जा पोहोचवून सौरऊर्जेचे महत्व अधोरेखित करून दिले आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी दोन ते तीन महिने वीज खंडित होती त्या काळात ह्या सौरऊर्जित दिव्यांचा येथे अनेकांना आधार मिळाला होता. दैनंदिन जीवनात शेतकरी तसेच येथील आदिवासी कुटुंबांना ह्या सौरदिव्यांचा चांगल्या प्रमाणात फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. 

दुर्गम खेडेगांवात जाऊन तेथील शेतकरी वर्गातील जेष्ठ नागरिकांस सौर उर्जेवर चालणाऱ्या दीव्यांचे वाटप केले गेले. ग्रामीण भागात रात्रीच्या काळोखात वाड्यावस्तीतून पायी चालताना या दिव्यांचा खुपच उपयोग होतो तसेच सौरदिवे अगदी सर्व साधारण प्रकाशात देखिल चार्जिंग करुन वापरण्यास अत्यंत सोपे आहेत. अधुन मधून खंडित होणारी वीज अशा वेळी पटकन लावता येतात जवळपास सहा ते बारा तास व्यवस्थित प्रकाश देतात. दिवाळी सणात प्रकाशमान सौरदिवे भेट मिळाल्याने दुर्गम ग्रामीण भागातील जेष्ठ शेतकरी ग्रामस्थांचे चेहरे समाधानाने उजळले.

परिज्ञान परिवार संस्था २००७ साली लोणावळ्यामधील कार्ला येथील स्वामी परिज्ञानाश्रम यांच्या स्मरणार्थ लोकसेवेसाठी स्थापन करण्यात आली असून संस्थेमार्फत अनेकांना वैद्यकीय मदत देखील पुरवली जाते, सध्या संस्थेमार्फत लोणावळ्यात दहिवली, कार्ला येथे वृद्धाश्रम देखील स्थापित करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या