जिल्हा रुग्णालयातील करोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळेच्या उभारणी कामाची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केली पाहणी.


वैभव सत्वे , प्रतिनिधी

      रायगड: दि. १० -अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयात करोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काही दिवसांपूर्वी शासनाने निर्गमित केला होता. या अनुषंगाने करोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळेच्या उभारणी कामाची आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पाहणी केली.

 यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे, डॉ.गजानन गुंजकर, डॉ.शितल जोशी-घुगे, तहसिलदार सचिन शेजाळ हे उपस्थित होते.

प्रयोगशाळा उभारणीच्या कामाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे काम कोणत्याही परिस्थितीत दि.१५ ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

या करोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्ह्यातील विविध सार्वजनिक व खाजगी उपक्रम यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रायगड जिल्ह्यासाठी  कोविड तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्याची मंजूरी प्राप्त झाली आहे. या लॅबमुळे नागरिकांचे स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट जिल्हास्तरावरच वेळेत मिळण्यासाठी उपयोग होणार आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्हा रूग्णालय येथे ही लॅब मंजूर व्हावी, यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला होता. यामुळे रायगडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 ही प्रयोगशाळा मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विशेष आभार मानले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या