थंडा थंडा कुल कुल नको रे बाबा...कोरोनाची दहशत.!

रविंद्र कुवेसकर,प्रतिनिधी

माणगांव: दि २९ - ऐन उन्हाळ्यात चोवीसतास थंडगार गोष्टींची गुलाम प्रवृत्ती कोरोना दहशतीने गारठली.

थंडगार विसरा, गरम कोमट पाणी पिण्याच सल्ला ऐका ! अस जो तो एकामेकांस बजावुन सांगत सुटलाय. सार कस विपरित घडतयं. कोरोना मुळे थंडगार फ्रिज देखील गारठला आहे. एवढे तापमान वाढले आहे कि दूपारी बारा ते तीन प्रचंड उकाडा जाणवतोय पण फ्रिजमधिल गार पाणी, विविध फ्लेवरच्या थंडगार आईसक्रिम, कोल्ड्रिंक्स- थम्सअप, मिरिंडा, कोकाकोला, सेव्हनअप, अॅपी, पेप्सी, फण्टा तसेच अनेक प्रकारच्या बियर्स, थंडगार शितपेयं लस्सी, लिंबूसरबत, कोकम सरबत, पियुष याची साधी आठवणही आता होत नाही. अंगच्या अतीउष्ण गुणधर्माच्या मद्यपेयांच्या प्याल्यातही बर्फाचे तुकडे (आईसक्युब ) टाकून स्टायलीश पेग रिचविणाऱ्या मद्यपिंना या थंडगार मद्याचाही नाईलाजास्तव विसर पडला आहे. सगळं सगळं गारठलय, अस चित्र जिथंतिथं पाहावयास मिळत आहे. कोरोनाच्या दहशती मुळे थंडा थंडा कुल कुल नको रे बाबा अस बोलण्याची पाळी सर्वांवर आली आहे.
या मोसमात ऐन उन्हाळ्यात प्रत्येक घरातील टीव्हीवरील अनेक चॅनल्स वरुन प्रसारीत होणाऱ्या त्या कोल्ड्रिंक्स, आईस्क्रिमच्या जाहीरातींचा भडिमार देखिल कोरोनाने थंडावलाय; एवढे प्रचंड तापमान वाढले आहे. पण कोणीही यांच्या वाटेला जात नाहीत. या सर्व गोष्टींचे प्रचंड मोठे मार्केटींग आणि वेगवेगळ्या ऑफर्स पूर्णतहा थांबल्यात. त्यामुळे एक गोष्ट मात्र निश्चित पहायला मिळायची लोकांना सर्दी, खोकला, ताप असे किरकोळ आजार या मोसमात होत असायचे. आता ते प्रमाण प्रचंड घटले, जवळजवळ नाहीसे झाले आहे. दवादारुखाणेही गारठले आहेत. ही मोठी आश्चर्याची गोष्ट अनुभवायला मिळत आहे. कोरोनाचा असा चांगला उपयोगही झाला आहे. तसेच यामुळे दूसऱ्या बाजूला या क्षेत्रातील उद्योग व्यवसायांवर अवलंबीत अनेक छोटेमोठे पूरक उद्योग आणि त्यात काम करणारी अनेक माणसे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आता या लोकांना सावरायला थोडा वेळ लागेल.

तरीपण विचार केला तर माणसाला ऐन उन्हाळ्यात ऋतुचक्र, वातावरणावर मात करुन बाराही महिने थंड वातानुकुलीत ( एसी ) वातावरणाच्या सवयींनी गुलाम बनविले होते. आपण हे सगळे जीवाचे चोचले का सूरु केले होते ? यावर पून्हा एकदा विचार करावा लागेल. हे नसते केले तरी चालले असते ! कारण आता लाॅकडाऊन मध्ये कोरोनाच्या भीती मुळे आपले हे सर्व चोचले आपणच आपोआप बंद केलेत. त्यामुळे वातानुकुलित एसी कुलर चिल्ड यंत्रणा आता एवढ्या तापमानातही गारठल्या, ठप्प पडल्या आहेत. काल पर्यंत या सर्व सवयींची गुलाम झालेली माणस एकदम अचानक गुलामीतून मुक्त झालीत ! चाळीस डीग्री तापमानाचे पुढे गेलेला पाऱ्याची दाहकता आता मानवाला सुसह्य वाटू लागली आहे. यामुळे एक गोष्ट मात्र लक्षणीय झाली ती म्हणजे पृथ्वीवरील प्रदुषण नक्कीच काही प्रमाणात कमी झाले आहे. याचे चांगले परिणाम भविष्यातील वातावरणात पहायला मिळतील असे ऐन उन्हाळ्यात कोरोना दहशतीने गारठलेल्या जनतेमधून बोलले जात आहे.
 
                        पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या