प्रतिनिधी - वसई
*मागील तीन आठवड़े शहर 'लॉकडाउन'मध्ये आहे. या काळात किती तरी लोकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. अशा लोकांना शोधून त्यांच्यापर्यंत योग्य ती मदत पोहोचवण्याचे काम मनोहर गुप्ता आणि त्यांचे सोबती करत आहेत.*
.......
तुम्ही वसई तहसील कार्यालयाजवळ कधी न कधी नक्कीच गेला असाल. काही वेळा या ठिकाणी एक व्यक्ती वसई पुरवठा विभागाविरोधात आंदोलन करतानाही तुम्हाला दिसली असेल. कामाच्या किंवा अन्य कारणांमुळे तुम्ही तेव्हा त्या व्यक्तीकडे दुर्लक्षही केले असेल.
पण या व्यक्तीची अनेक आंदोलने लक्षवेधी ठरली होती. याच व्यक्तीच्या आंदोलनांमुळे रेशनिंग दुकानांत चालणारा काळाबाजार; त्यात असलेली सरकारी अधिकाऱ्यांची भागीदारी जनतेसमोर आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांपासून थेट राज्याच्या मुख्यमंत्री, महसूलमंत्री इथपर्यंत या व्यक्तीने विविध आंदोलनांतून आणि पत्रांद्वारे पाठपुरावा करून वसईतील रेशन कार्डधारक जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. वसई तहसील कार्यालयाजवळ मागील वर्षी तब्बल 99 दिवसांचे आंदोलन सर्वाधिक चर्चेचे ठरले होते. या आंदोलनामुळे वसई तहसीलमधील काही कर्मचाऱ्यांच्या बदलीही झाल्या होत्या. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्यक्तीच्या आंदोलनांचा धसका घेतला होता.
*या व्यक्तीचे नाव आहे मनोहर गुप्ता!*
वसई तहसील कार्यालयाजवळ कधी आपण गेलात तर एक थोडीशी वयस्कर, ठेंगणी; पण तब्बेतीने जाड़ी मोठमोठ्याने बोलणारी व्यक्ती तुम्हाला दिसेल. कधी सफारी; तर कधी साधी शर्ट-पँट असा पेहराव करणारी ही व्यक्ती मोठमोठ्याने बोलून मुद्दाम आपले लक्ष वेधते आहे की काय, असे सुरुवातीला आपल्याला वाटेल. अर्थातच विषय असेल रेशनिंग दुकानांतून चालणारा काळाबाजार.
पण तुम्ही त्यांच्या बोलण्याचा कानोसा घेतला तर कदाचित त्यांच्या बोलण्यात तथ्य दिसेल. त्यांच्या बोलण्यातील पोटतिडीक जाणवेल. या पोटतिड़कीतून आणि गरीबांप्रति असलेल्या संवेदनेतूनच गुप्ता यांची आंदोलने उभी राहिली होती. गरीबांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळावे, यासाठी त्यांनी प्रशासनाविरोधात केलेला तो झगड़ा होता.
*पण कोण आहेत हे मनोहर गुप्ता?*
मनोहर गुप्ता यांचा जन्म विरारचा. त्यांचे आजोबा अंदाजे दीडशे वर्षांपूर्वी विरार येथे आलेले. पण थोड्याशा अड़चणीमुळे 50 वर्षांपूर्वी कामण येथे स्थलांतरित झाले. त्या वेळी त्यांचे वडील भाजीपाला विकून त्यांचा आणि कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत. त्यानंतर ते वीटभट्टी व्यवसायात आले. आणि परिस्थिती सुधारली तसे मग इमारतीला लागणाऱ्या वस्तू सप्लाय करायला लागले.
पण मनोहर गुप्ता यांनी समाजसेवेचे बाळकडू घेतले ते वडिलांकडून. भाजी विकत असले तरी त्यांचे वडील होईल तितकी समाजसेवाही करत होते. कामण येथील एका आश्रमशाळेला 25 वर्षापूर्वी केवळ दोन रुपये किलो या दराने भाजी पुरवत होते. ही सेवा त्यांनी तब्बल 25 वर्षे दिली.
हाच वसा आज मनोहर गुप्ता पुढे घेऊन जात आहेत. समाजसेवेबरोबरच त्यांची पत्रकारिताही सुरु होती. पत्रकारितेतून अनेक समस्यांना न्याय देता येतो म्हणून त्यांनी 'समाजमन' हे साप्ताहिकही सुरू केलेले. सोबत समाजसेवेच्या माध्यमातून ते अडल्या-नडल्या व्यक्तीना मदत करत होतेच. कुणाचे रेशन कार्ड बनव; ज्यांची नावे रेशन कार्डवर नाहीत; त्यांची नावे नोंदणी कर अशी ही कामे होती.
हा काळ 2004 चा. म्हणजेच 15 वर्षांपूर्वीचा. हीच कामे करताना मनोहर गुप्ता यांच्या लक्षात रेशनिंगच्या नावे सुरू असलेला काळाबाजार आला. आणि त्यांनी याविरोधात दंड थोपटले. त्या वेळी रॉकेल आणि रेशनिंगद्वारे नागरिकांना मिळणारी सबसिडी अधिकारी दुकानदारांच्या माध्यमातून लुटत होते. ही बाब मनोहर गुप्ता यांनी पुराव्यानिशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. पण हा भ्रष्टाचार मोठा होता. वरपर्यंत होता. साहजिकच मनोहर गुप्ता यांनाच हरवण्यासाठी भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी आणि त्यांची माणसे कामाला लागली.
*पण मनोहर गुप्ता हरले नाहीत; त्यांचा लढा सुरूच राहिला.... तो आजपर्यंत सुरूच आहे.*
या संवेदनशील स्वभावातूनच आजही ते अविरत काम करत आहेत. आज कोरोनाचे संकट असतानाही ते आपल्या विजिगीषु वृत्तीतून समाजसेवच्या मैदानात आहेत.
मागील तीन आठवड़े शहर 'लॉकडाउन'मध्ये आहे. या काळात किती तरी लोकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. अशा लोकांना शोधून त्यांच्यापर्यंत योग्य ती मदत पोहोचवण्याचे काम मनोहर गुप्ता आणि त्यांचे सोबती करत आहेत.
मागील तीन आठवड्यात त्यांनी कामण, सातीवली, चिंचोटी, बेलवड़ी, तामणमाळ येथील हातावर पोट असलेल्या अनेक लोकांना तब्बल 15 टन धान्य पोचवले आहे. शिवाय इथल्या परिसरात स्वखर्चाने सॅनिटायझिंग करून घेतले आहे. यात त्यांच्या मुलाचा सहभाग मोठा आहे.
याशिवाय गुप्ता यांनी विरार येथेही मोठी मदत पोचवली आहे. विरार पूर्व चंदनसार, गेवराई पाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरीब लोक आहेत. काही रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्ती आहेत; त्यांच्या रोजच्या नाश्ता आणि जेवणाची आबाळ आहे. अशा व्यक्तीना दररोज समोसा, वडापाव, पाण्याची बाटली आणि अन्य वस्तू न चुकता देण्याचे काम मनोहर गुप्ता करत आहेत.
या सगळ्यात ते खरी सेवा देणाऱ्या महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना विसरलेले नाहीत. या कर्मचाऱ्यांनाही गुप्ता नाश्ता देण्याचे काम करत आहेत. इतक्यावरच मनोहर गुप्ता थांबलेले नाहीत. तर लॉकडाउन वाढल्यास उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन आत्यंतिक गरजू व्यक्तीना थेट शिजवलेले अन्न पुरवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. आणि अशा गरजू व्यक्ती आपल्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहनच त्यांनी आपल्या मित्रमंडळीच्या माध्यमातून केले आहे.
*- संजय राणे*



0 टिप्पण्या