आदिती तटकरे यांनी जिंकली माणगावकरांची मने..!
लाडक्या बहिणींनी घेतली प्रचाराची धुरा खांद्यावर
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव- दि. ८- राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी माणगाव शहरात प्रत्येक विभागात बैठकांमध्ये त्यांनी लाडक्या बहिणी सहीत समस्त माणगाव शहरातील भावांचीही मने जिंकली. आदिती तटकरे यांनी भाऊ आणि बहीणींच्या ह्रदयातील भावनांना वाट मोकळी करून दिल्याने आदिती तटकरे यांच्या प्रचाराची धुरा लाडक्या बहिणींनी आपल्या खांद्यावर घेतली आहे असेच चित्र जणू काही दिसत होते.
त्या आल्या.. आणि त्यांनी जिंकली... लाडक्या बहिणींची मनं... आपल्या ओघवत्या शैलीत भाषण करीत लाडक्या बहिणींशी संवाद साधताना त्यांनी बहिणींच्या थेट ह्रदयाला हात घातला. लाडक्या बहिणींच्या व्यथा आणि दुःख भावांसमोरच आदिती यांनी मांडून आमचे मन मोकळे केले आहे. लाडक्या बहिणींच्या भावना जाणून घेतल्या. त्यामुळे आमचं मन हलकं झालं आहे. त्यांचे उपकार आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर राहतील असे मत प्रांजळपणे लाडक्या बहिणींनी व्यक्त केले.
श्रीमंत कुटुंबातील व्यक्तींना शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून दिलेल्या दिड हजार रुपयांचे मोल कळणार नाही. परंतु गरीब लाडक्या बहिणींना दिड हजार रुपये त्यांच्यासाठी अनमोल ठेवा आहे. गरीब बहिण खस्ता खाऊन आणि पदरमोड करून घरखर्च भागविण्यासाठी अपार कष्ट करते. प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हळूहळू चालवत असते. त्या बहिणींना आधार आणि त्यांचा सन्मान म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून दिड हजार रुपयांचा सन्मान निधी वितरीत करण्यात आला आहे. याचे समाधान आणि भाग्य मला लाभले यांच्या आनंदापेक्षा आपल्या चेहऱ्यावरील आनंद दुसरा असूच शकत नाही अशा भावना आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या.
आपल्या सरकारने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात दर महिन्याला मिळत असलेली दिड हजारांची रक्कम आता २१०० रुपये केली आहे. काही बहिणींना तांत्रिक अडचणींमुळे मिळाले नसतील त्यांना निवडणूकी नंतर पैसे मिळतील अशी खात्री आदिती तटकरे यांनी दिल्यानंतर काही हिरमुसलेल्या बहिणींच्या चेहर्यावर आनंदाचे हुंकार आणि हास्य फुलले. आता आम्ही आदिती तटकरे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन पदर खोचून रणरागिणी बनून काम करत राहू असे उद्गार बहिणींनी काढले.
आदिती तटकरे या प्रचारात नम्रपणे निवेदने, तक्रारी स्विकारत होत्या. साधी राहणीमुळे ताई आपल्यातीलच एक बहिण आहे असेच बहिणींना वाटत होते. सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत होत्या. कुठेही मंत्री किंवा आमदार आहोत याचा बडेजाव बहिणींना दिसत नसल्याने आदिती तटकरे यांनी मतदारांवर आपुलकीची भुरळ घातलेली दिसली.
माणगाव शहरात केवळ आणि केवळ महायुतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. या शहरात नगरपंचायतला सर्वात जास्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले हे संपूर्णपणे सहकार्य करीत असल्याने आपल्या आशा - आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्या जातील असे अभिवचन आदिती तटकरे यांनी समस्त माणगाकरांना दिले.
सभा संपल्यानंतर लहान मुलांना आणि तरुण कंपनीला आदिती तटकरे यांची आठवण साठवून ठेवण्यासाठी मोबाईल मध्ये सेल्फी काढण्यासाठी प्रचंड गर्दी होत होती. त्या त्यांना आपले मंत्री पद बाजूला ठेवून हसतमुख पोज देताना दिसत होत्या. या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्या चेहऱ्यावरील जिंकण्याचा ठाम आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. या प्रचार सभांना महिला बहिणींची उपस्थिती लक्षणीय आणि डोळ्यात भरणारी होती. या गाव बैठका उतेखोल, भादाव, नाणोरे आणि जूने माणगाव येथे संपन्न झाल्या.
या सभांसाठी शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, योगीता चव्हाण, नितीन वाढवळ, दिलिप जाधव, सचिन बोंबले, रत्नाकर उभारे सर्व महिला नगरसेविका, सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते.




0 टिप्पण्या