पोस्को कंपनीचा बेटी बचाओ बेटी पढाओ स्तुत्य उपक्रम
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १- सन २०१७ वर्षांपासून पोस्को कंपनीने त्यांच्या सी. एस.आर. उपक्रमाअंतर्गत भागाड ग्रामपंचायत हद्दीतील जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावे रुपये ५०,०००/-, १८ वर्षा करिता मुदत ठेव स्वरूपात राष्ट्रीयकृत बँकेत जमा करत आहे. “बेटी बचाओ बेटी पढाओ” ही भारतातील मुलींच्या गुणोत्तराला प्रोत्साहन देणारी केंद्र सरकारची योजना आहे. २०२१ या वर्षी १० मुली या योजनेस पात्र ठरल्या, पात्र मुलींच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत जमा केलेल्या मुदत ठेवीच्या मूळ पावत्या हस्तांतरणाचा कार्यक्रम दिनांक २१ मार्च २०२३ रोजी सकाळी भागाड ग्रामपंचायत कार्यालयात कंपनीच्या संचालकांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी भागाड ग्रामपंचायतीचे सरपंच कौशल्या राम वाघमारे, उपसरपंच बाबुराव पोळेकर, सदस्य व लाभार्थींचे पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना ग्रामपंचायतीचे सदस्य जतीन महाडिक यांनी कंपनीच्या या उपक्रमाचे कौतुक केले व याचा लाभ नक्कीच मुलींच्या भवितव्यासाठी होईल अशी भावना व्यक्त केली. विभागातील मुलींच्या तसेच ग्रामस्थांच्या कल्याणासाठी अशा अनेक योजना कंपनीने राबवाव्यात त्यासाठी लागणारे संपूर्ण सहकार्य ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ करतील असे आश्वासन दिले.
वरील प्रसंगी या उपक्रमाचा आढावा घेताना कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, २०१७ पासून ही योजना चालू असून आज तागायत (२०२१) पर्यंत ७१ मुलींना ह्याचा लाभ घेता आला आहे. दर हजारी पुरुषांमागे मुलींचे गुणोत्तर प्रमाण सुयोग्य राहावे या करिता शासकीय उद्देशाला व उपक्रमाला धरून हा उपक्रम कंपनी गेली अनेक वर्ष सातत्याने राबवीत आहे. कंपनीच्या या उपक्रमाचे लाभार्थी व ग्रामस्थांमधून खूप कौतुक होत आहे.






0 टिप्पण्या