जिल्ह्यातील नद्या पुनरुज्जीवत करण्यासाठी रोड मॅप तयार करून सादरीकरण करावे- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे निर्देश.
पोलीस प्रवाह न्यूज
ठाणे : दि. १८ - जिल्ह्यातील नद्या वाहत्या राहण्यासाठी तसेच प्रदुषण विरहित करण्यासाठी काय काय उपाय योजना करता येईल यासंदर्भात ‘चला जाणूया नदीला’ अभियानाअंतर्गत रोड मॅप तयार करावा. तसेच सर्व विभागांनी यासंदर्भात पुढील बैठकीत कृती आराखड्याचे सादरीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे दिले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची जिल्हास्तरीय पहिली बैठक जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपवनसंरक्षक तथा समितीचे सदस्य सचिव संतोष सस्ते, सदस्य उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे डी.एम. कोकाटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छाया सिसोदे, अभियानाच्या समन्वयक स्नेहल दोंदे, वसुंधरा मंडळाचे संस्थापक अनंत भागवत यांच्यासह नदी पुनरुज्जीवन क्षेत्रात काम करणारे विविध सदस्य यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, ‘चला जाणूया नदीला’ या अभियानामध्ये जिल्ह्यातील भातसा, उल्हास, वालधुनी, कुंभेरी, कामवारी, भारंगी, कनकवीरा, चोर नदी, लेणाड नदी या नद्यांचा समावेश आहे. या नद्यां पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच त्या वाहत्या करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे. तसेच शास्त्रीय दृष्टिकोनातून काय करता येईल याबाबतही विचार करावा. नद्यांच्या पूररेषा निश्चित करण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी. त्या पुररेषातील अतिक्रमणे हटविण्यासाठी कायदेशीर उपाय योजावे लागतील. नद्यांच्या किनाऱ्यावरील उद्योगांकडून होणारे दुषित सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे व दुषित पाण्याचे स्त्रोत बंद करण्यासाठी कडक उपाय योजावेत.
नद्यांच्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देता येईल का यासंदर्भात नियोजन करावे. पाणीसाठ्याची क्षमता वाढविण्यासाठीही वेगवेगळे उपक्रम राबविण्यात यावेत. प्रदुषणासंबंधी गावातील नागरिकांचे विशेषतः महिलांची जनजागृती करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही श्री. शिनगारे यांनी दिल्या. श्रीमती स्नेहल दोंदे यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या संदर्भातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले व अभियानात कशाप्रकारे काम अपेक्षित आहे याची माहिती दिली. नदी स्वच्छतेतून गावाचा विकास करण्याचे ध्येय ठेवून हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर श्री. भागवत यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काय करता येईल याबद्दल माहिती दिली.




0 टिप्पण्या