पिंपरी चिंचवड - शिक्षक-आदर्श समाजाचे शिल्पकार..

 

पुणे पिंपरी :- प्रतिनिधी 

बाळासाहेब सूळ - वाकड 



आयुष्यात ज्यांनी मला घडविले अश्या माझ्या सर्व शिक्षकांच्या चरणी नतमस्तक होऊन आज शिक्षक दिनी हार्दिक शुभेच्छा.

खरं म्हणजे शिक्षक व रस्ता यात एक साम्य आहे,स्वतः जिथे आहे तिथंच राहतात पण इतरांना ध्येयापर्यंत पोहचवितात...

समाज व शिक्षक यांचे नाते अतूट आहे. तसेच ते अमूल्ही आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील परंपरेमध्ये समाजऋण

फेडण्यासाठीचाही उल्लेख आढळतो. शिक्षक म्हणजे समाज घडविणारा सर्जनशील घटक. राष्ट्राची ध्येय-धोरणे बळकट करण्यासाठी व देशाला अधिक बलशाली बनवण्यासाठी जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे आखली जातात त्याची रूजवणं करणारा, ती मूल्ये वृध्दिंगत होण्यासाठी संस्कार करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. राष्ट्रउभारणीत शिक्षण व शिक्षकांना महत्त्वाचे स्थान आहे. अशावेळी एखाद्या राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षक हा महत्त्वाचा मानला जातो. समाजातील अनेक पिढय़ा त्यांच्या हाताखालून जात असतात. 

या पिढय़ांना माणूस म्हणून घडवताना राष्ट्रीय चारित्र्यही घडणे अभिप्रेत असते. महात्मा गांधीजींना शिक्षणांची व्याख्या करताना हेच अभिप्रेत होते व ते कालातीतही आहे. 

भारताची सांस्कृतिक उज्ज्वल परंपरा पाहताना आपल्याकडे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. डॉ. राधाकृष्णन यांनी केलेल्या कार्याला आपण देशभर असा दिवस साजरा करून अभिवादन करतो. 

डॉ. राधाकृष्णन हे बनारस विद्यापीठाचे कुलगुरू होते. ते उपराष्ट्रपती होते, ते राष्ट्रपतीही झाले होते. राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी, राजदूत, भारतीय तत्त्वज्ञानाचे उपासक, थोर तत्ववेत्ते होते व ते शिक्षकही होते. 1948 च्या स्वतंत्र भारताच्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भारतीय शिक्षण क्षेत्रासाठीचे मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या विविध क्षेत्रातील योगदानामुळे त्यांच्या कार्याचे आज शिक्षक दिनी आपण  स्मरण करत असतो.

समाजाचे शिल्पकार असलेल्या सर्व शिक्षकांचा गौरव व त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून  दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन  साजरा आपण करत असतो.

माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या