मुळशी वनविभागाचा अवैध वृक्षतोडीवर कारवाईचा बडगा.

नेरे येथील एकाच कारवाईत केला तब्बल 8 लाख रुपयांचा दंड.

पोलीस प्रवाह न्यूज 

रायगड : दि.११ - मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली बऱ्याच वेळा वृक्षसंपदेची कत्तल केली जाते. काही वेळा वनविभागाची रीतसर परवानगी घेतली जाते, तर बऱ्याच प्रकरणात वनविभागाकडे असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळाचा फायदा घेऊन कोणाच्या लक्षात येणार नाही हे गृहीत धरून मालकी क्षेत्रात विनापरवानगी अवैध वृक्षतोड केली जाते. असेच एक प्रकरण नुकतेच मौजे नेरे, ता- मुळशी , जि - पुणे येथे घडले आणि विकासकाला विनापरवानगी वृक्षतोड करणे चांगलेच महागात पडले. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी तथा वृक्ष अधिकारी पौड (मुळशी) संतोष चव्हाण यांनी थोडाथिडका नव्हे तर तब्बल ८ लाख रुपयांचा दंड बजावला आणि तो वसुलही केला.

दत्तवाडी (नेरे), ता मुळशी येथील वसुंधरा सामाजिक उन्नती वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन सहकारी संस्था मर्यादित यांनी दिनांक ०७/०३/२०२४ रोजी मुळशी वनविभागाच्या भरे येथील कार्यालयात त्यांचे मालकी क्षेत्र सर्व्हे नंबर ३८, हिस्सा नं १ चे एकूण क्षेत्र ०६ हे. ३३.५० आर इतक्या क्षेत्रात त्यांनी सन २०१६ मधे लावलेले एकूण ४०० वृक्ष व इतर नैसर्गिकरीत्या उगवलेले वृक्ष यांची अवैध वृक्षतोड झालेबाबत तक्रारी अर्ज दाखल केला होता. अतुल साठे, बाबासाहेब बुचडे यांचेसह इतर ३०-४० लोकांनी मिळून सदरचे कृत्य केल्याचे तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार वनविभागाचे घोटावडे वनपरिमंडळ अधिकारी श्रीमती प्रज्ञा बनसोडे, कासारसाई नियतक्षेत्राचे वनरक्षक श्री पांडुरंग कोपणर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी पौड यांच्या आदेशानुसार जागेवर जाऊन स्थळपाहनी केली व पंचांसमक्ष स्थळ पंचनामा नोंदवला असता त्यामधे सुमारे ८००-८५० झाडांची तोड झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुढील चौकशीसाठी आरोपींना नोटीस बजावली असता आरोपी यांनी भरे येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात  उपस्थित राहून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री संतोष चव्हाण यांचा समक्ष जबाब नोंदवला व त्यामध्ये आरोपी यांनी गुन्हा कबूल करून शासकीय नियमाप्रमाणे होणारा दंड भरण्यास तयार असल्याचे जबाबामध्ये लिहून दिले. त्यानुसार महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन), अधिनियम १९६४ चे कलम ३ व ८ नुसार तसेच Maharashtra Land Revenue (Regulation Of Right To Trees etc.) Ammendment Rule 2017 चे प्राप्त अधिकारानुसार वृक्ष अधिकारी या नात्याने वनपरिक्षेत्र अधिकारी पौड (मुळशी) यांनीएकूण ८०० झाडांसाठी प्रती झाड रू १०००/-  प्रमाणे एकूण ८ लाख रुपये दंड ठोठावला. सध्या या कारवाईची सर्वच स्तरातून चर्चा होत असून मालकी क्षेत्रातील अवैध वृक्षतोड प्रकरणात आजअखेर महाराष्ट्रातील सर्वात मोठी दंडात्मक कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे मुळशीतील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली असल्याचे दिसून येत आहे.

 अवैध वृक्षतोड करणे हा कायद्याने गुन्हा असून कुठेही विनापरवानगी वृक्षतोड आढळल्यास त्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईन. वृक्षतोड करणे अनिवार्य असल्यास वनविभागाकडे रीतसर अर्ज दाखल करावा, प्रकरनाची शाहनिशा करून व प्रकरनाची निकड तपासून  रीतसर परवानगी देण्यात येईन.

                संतोष चव्हाण 

          वनपरिक्षेत्र अधिकारी, पौड