माणगांवमधून बेपत्ता झालेले नारायण शेट तब्बल ७२ तासांनी सुखरूप परतले घरी
अज्ञात व्यक्तीने केले होते अपहरण
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. ३- माणगांव शहरातून बेपत्ता झालेले नारायण शेट तब्बल ७२ तासांनी सुखरूप घरी परतले. अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचे समोर आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. ३१ मे रोजी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास नारायण गंगाराम शेट, वय ७४ वर्ष, रा. जे. बी. डी. प्लाझा, एच. डी. एफ. सी बँक समोर, माणगांव हे मोर्बा रोडवरील त्यांचे दुकान कोकण कृषी सेवा केंद्र येथे जातो असे घरी सांगून गेले होते. परंतु, ते तिथून बेपत्ता झाले होते. दुकानाचे शटर अर्धवट अवस्थेत खोललेले दिसुन आले. परंतु, नारायण शेट मात्र बेपत्ता झाले होते. त्यावेळी त्यांच्याकडे एकूण ४ लाख २० हजार रोख रक्कम होती. त्यांच्या कुटूंबियांनी सदरची माणगांव पोलीस ठाण्यास दिल्यानंतर पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम सुरू करण्यात आली. काही प्रत्यक्षदर्शी व सी सी टी व्ही माहिती आधारे ते एका चार चाकी गाडीत बसून निघून गेल्याची बाब समोर आली. त्यांचे कुटुंब व पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र ३ दिवस झाले तरी काही ते भेटून आले नाही. या गोष्टीने माणगांव शहरात एकच खळबळ उडाली होती. अनेक चर्चा ऐकण्यात येत होत्या. नेमकं काय घडलं याची माहिती मिळत नव्हती. एकदा त्याच फोन लोकेशन महाड तर एकदा अलिबाग दाखविल्या नंतर पुढे काहीच माहिती मिळत नव्हती. पोलीस यंत्रणा आपला तपास चोखपणे करीत होती.
त्यातच दि. ३ जून दुपारी. १ वा. च्या सुमारास अचानकपणे त्याच्या राहत्या घरासमोर ते बस मधून उतरून घरी पोहचले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ३१ मे रोजी नारायण शेट हे दुकान उघडीत असताना अज्ञात व्यक्तीने ईसार कंपनीचे साहेब आले असून त्यांना तुमच्याशी बोलायचे आहे असे सांगून त्यांना चार चाकी गाडीत कोंबले. त्यानंतर त्यांना गाडीतच मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली. डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे एका घनदाट जंगलात अंधाऱ्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. अज्ञात व्यक्तींकडून त्यांना सतत मारहाण करण्यात येत होती. त्यांच्याकडुन अनेक मागण्या करण्यात आल्या व त्यांच्या स्वाक्षऱ्याही अपहरणकर्त्यांकडून घेण्यात आल्या. दि. २ जून च्या मध्यरात्री त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येत असताना संधी मिळाल्याने त्यांनी तेथून पलायन केले. व संगमेश्वर एस्टी स्थानक गाठले आणि तेथून सकाळी ९ वाजण्याची सुमारास संमेश्वर कडून भिवंडी जाणारी गाडी पकडून सरळ माणगाव गाठले. यात एकूण ८ आरोपी यामध्ये सामील असल्याचे समजत आहे. त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली असून अज्ञात व्यक्तीं विरोधात भा. दं. वि. स. क. ३९४, ३४२, ३४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी आस्वर करीत आहेत.



0 टिप्पण्या