सिद्धनेर्लीचा रणजित निकम महाराष्ट्राचा कर्णधार
२५ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट संघ निवड
कोल्हापूर-दि. १७- केरळ येथे संपन्न होणाऱ्या २५ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी ( Under 25 State A Trophy ) महाराष्ट्राच्या संघाची आज घोषणा करण्यात आली. १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व कोल्हापूरच्या रणजित रमेश निकम यांचेकडे सोपवण्यात आले आहे. नागपूर येथे संघ निवडीकरिता आयोजित करण्यात बापूंना चषक स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये रणजित निकम याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर २ सामन्यात २१० धावा फटकवल्या. यामध्ये दुसऱ्या सामन्यात ११४ चेंडूत ५ षटकार व १४ चौकारांच्या मदतीने केलेल्या १४२ धावा त्याच्या स्फोटक फलंदाजीची ओळख करून देतात.
रणजित रमेश निकम याचे शालेय शिक्षण प्रियदर्शिनी इंदिरा हायस्कूल सिध्दनेर्ली ता. कागल जि. कोल्हापूर या शाळेत झाले. त्याची क्रिकेटमधील आवड लक्षात घेता शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. भाऊसाहेब लाड सर यांनी त्याच्यामधील गुणवत्ता ओळखून शाळेमध्येच क्रिकेटचे धडे द्यायला सुरू केले. त्याच्या पुढील सरावासाठी त्याला कागल किकेट अॅकॅडमी येथे श्री. निसार मुजावर सर यांच्या मार्गदर्शनाखाली वडिलांनी दाखल केले. त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे त्याची २०१३-१४ साली १४ वर्षाखालील कोल्हापूर जिल्हा संघामध्ये निवड झाली. तो उजव्या हाताने उत्कृष्ट फलदांजी व उत्तम ऑफ स्पिन गोलंदाजी करतो.
त्याच्यातील कलागुण ओळखून संघ व्यवस्थापनाने त्याला १४ वर्षाखालील कोल्हापूर जिल्हा संघाचा २०१४ साली कर्णधार केले. त्यानंतर २०१४-१५ साली १६ वर्षाखालील व २०१५/१६ मध्ये १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केली. यादरम्यान त्याने कोल्हापूर येथील रमेश कदम अॅकॅडमीमध्ये माजी रणजीपटू श्री. रमेश कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करू केला. इ. ७ वी ते इ. १० वी पर्यंत तो आपल्या वडिलांच्या बरोबर दररोज सकाळी ५ .४५ वाजता सिध्दनेर्ली ता. कागल येथून कोल्हापूर येथे सरावासाठी जात असे. त्याच्या चांगल्या खेळाच्या जोरावर त्याची २३ वर्षाखालील महाराष्ट्र एक दिवसीय संघात निवड झाली. त्यामध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळताना मध्यप्रदेश विरूध्द ९४ चेंडूत ९ चौकार व ८ षटकाराच्या सहाय्याने १२० धावांची खेळी करत महाराष्ट्रास हा सामना जिंकून दिला.
त्यानंतर २०१९-२० च्या हंगामात २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघातून खेळताना त्याने गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेश संघाविरूध्द सलग ३ सामन्यात ३ शतके झळकवली होती. याच कामगिरीच्या जोरावर २०१९ साली त्याची महाराष्ट्र विरूध्द उत्तराखंड या सामन्यासाठी महाराष्ट्र संघात रणजी क्रिकेट ट्रॉफीसाठी निवड झाली. रणजित २०१७/१८ पासून शिवाजी विद्यापीठ संघातून पश्चिम विभागात प्रतिनिधित्व करत असून २०१८/१९ पासून तो शिवाजी विद्यापीठ संघाचा कर्णधार आहे.
देशातील प्रतिष्ठेच्या सय्यद अली टी २० स्पर्धेत त्याने सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व केले आहे तसेच सन २०२०-२१ मध्ये विजय हजारे स्पर्धेत ही त्याने महाराष्ट्र संघाचा सदस्य म्हणून आपला सहभाग नोंदवला आहे. सी के नायडू चषक स्पर्धेतही २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात महाराष्ट्र क्रिकेट संघाचा रणजित सदस्य राहिला आहे. गेल्या ८ वर्षापासून सातत्याने राज्यस्तर, विद्यापीठ स्तर पश्चिम विभाग व जिल्हास्तरावर रणजीतने उत्कृष्ट कामगिरी करत आपले कौशल्य वेळोवेळी दाखवून दिले आहे.
रणजितचे वडील गावातीलच माध्यमिक शाळेत लिपिक आहेत तर आई गृहिणी आहेत. रणजित निकम यांनी अतिशय कष्टप्रद प्रयत्न करून मिळवलेले हे यश गावातील , ग्रामीण भागातील युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल, तसेच त्याने आपला खेळ असाच उंचावत मोठे यश मिळवावे अशा विश्वास त्याच्या आई वडिलांनी व्यक्त केला.



0 टिप्पण्या