रविंद्र कुवेसकर,प्रतिनीधी

माणगांव: दि २५ - मिडिया असो वा प्रिंट मिडिया असो पत्रकार, वार्ताहर, प्रतिनिधी, विशेष प्रतिनीधी ही नाव फक्त ऐकावयास बरी वाटतात. पत्रकाराने एखादे सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला बदनामीच्या पिंजऱ्यात अडकविले जाते. कसलीही अपेक्षा न बाळगता 'प'- पहारेकरी नव्यायुगाचा, 'त्र' - त्रयस्थ, तटस्थ पणे, 'का' - कायद्याच्या चौकटीत राहून, 'र' - रयतेचा रक्षक होऊन पिडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर लोकशाहीचा तथाकथीत चौथा स्तंभ आज वैश्विक कोरोना संकटात, संचारबंदीत जीवाची बाजी लावून प्रत्येक घटना, सत्य जगासमोर आणताहेत. यामुळे काही अपप्रवृत्तींच्या रोषाचे ते बळीही ठरतात. अनेकांच्या जडणघडणीत यांचा मोठा वाटा असतो, परंतु चुकलेल्यांना समाजासमोर उघडं करुन, आपल्या दूधारी लेखणीच्या चाबकाने फटकारणारा, जनतेचा खरा सेवक सुद्धा आज कोरोना संकटात दूर्लक्षित आहे. स्वतःची दूःख व हलाखीची परिस्थिती लपवून; जगासमोर स्वाभिमानाने लढतोय, जगतोय.

कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता काम करतोय. कोरोना संकटात सापडलेल्या अनेकांची वास्तव स्थिती, गोरगरीब, दीन दूबळ्यांची आर्थिक परिस्थिती जगासमोर आणली. भूकेलेल्यांना अन्न, मदत मिळवून देण्यासाठी याच पत्रकारांनी आवाज उठविला आहे. अनेकांना त्यांनी केलेल्या सत्कर्मांचे आपल्या लेखणीद्वारे कौतुक करुन प्रोत्साहीत केले. परंतु स्वतःसाठी मात्र कसलीच अपेक्षा केली नाही. याच गोष्टीची जाणीव महाराष्ट्रातील सत्ताधारी, विरोधकांना नाही? हीच मोठी खेदाची बाब आहे. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान आणि प्रशासकिय अधिकारी यांनी पत्रकारांची हीच स्वाभिमानी प्रवृत्ती लक्षात घ्यावी. त्यांनाही या घडीला मदत देण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी अशी ही वेळ आहे.

समाजातील पत्रकारांची प्रतिकुल परिस्थितीतही समाजप्रबोधनाची आज पर्यंतची अखंड परंपरा पाहावी. पत्रकारांचे वास्तव जाणावे शहरी, ग्रामीण, दूर्गम भागातून तुटपूंज्या मानधनावर काम करणाऱ्या या समाजातील प्रच्छन्न, दुर्लक्षित घटकाला म्हणजेच पत्रकारांना मदतीसाठी आजतरी कोणीही मायबाप या जगात दिसत नाही. ही गोष्ट या संकटात प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी आहे. सद्यस्थितीत चाललेल्या वैचारीक मंथनातून बाहेर पडलेले ते एक कटूसत्य आहे. काही अपप्रवृत्ती बोगस पत्रकारीता करीत स्वार्थासाठी पत्रकारीतेला बदनामही करीत आहेत. हेही सत्य नाकारता येत नाही. परंतु त्यामुळे सर्वच पत्रकारांना दोष देणे योग्य ठरणार नाही.

ज्या वर्तमानपत्रासाठी, चॅनलसाठी पत्रकार अहोरात्र काम करतात, त्या पत्रकारांना आज कोणतेही संरक्षण नाही, विमा नाही हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. तसेच या प्रिंट व ईलेक्ट्राॅनिक व्यवसायावर असंख्य पूरक व्यवसाय आणि त्यात काम करणारे अनेकजण आज कठीण परिस्थितीचा सामना करतायत. त्यांचेवर त्यांची कुटुंब अवलंबून असून त्यांनाही मदतीची गरज आहे. संबंधित वर्तमान पत्रांचे, चॅनल्सचे मालकांनी या गोष्टींकडे लक्षवेधावे तसेच शासन व्यवस्थेनेही याची दखल घ्यावी अशी माफक अपेक्षा या कोरोना संकट समयी व्यक्त होत आहे. माणसाचा अहंकार-गर्व, सत्ता-संपत्ती, पैसा-अडका, पत-प्रतिष्ठा कशालाही न बधणाऱ्या कोरोना संकटात तरी उघडा डोळे बघा नीट, विचार करा या पत्रकारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे, लोकशाहीचा हा चौथा स्तंभ.

                               पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews